सिडको : प्रतिनिधी
पंचवटी परिसरातील वाल्मीकनगर, सैलानी बाबा चौक येथील सुलभ शौचालयाजवळ एका घरावर छापा टाकून अमली पदार्थविरोधी पथकाने तीन लाख रुपयांचे 100 ग्रॅम
मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या कारवाईदरम्यान संशयित रवी राजू भालेराव पळून गेला. त्याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस हवालदार भारत डंबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाल्मीकनगर, सैलानी बाबा चौक, वाघाडी, पंचवटी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
रवी राजू भालेराव याच्या घराची झडती घेतली असता पारदर्शक प्लास्टिक पिशवीत फिकट तपकिरी रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला.
पथकाने इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर पदार्थाचे वजन केले असता 101 ग्रॅम आढळले. त्यानंतर पिशवीचे वजन वजा केल्यानंतर अमली पदार्थाचे वजन 100 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले.
सहायक केमिकल अॅनालायझर साक्षी कुर्हाडे व सायंटिफिक असिस्टंट यश जुनेजा यांनी पदार्थाची प्राथमिक तपासणी करून तो एमडीसदृश असल्याचे सांगितले. जप्त केलेला अमली पदार्थ मोबाइल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पॅक करून सीलबंद करण्यात आला. तसेच एमडी ठेवण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर रवी राजू भालेराव फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
100 grams of MD worth ₹3 lakh seized during a house search in Panchavati; suspect absconding.