सात लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त; बालक ताब्यात, एकजण फरार
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरासह परिसरातील मोटारसायकल चोरीबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. त्यात सुमारे 7 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील न उघड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोसम पूल परिसरातील बसस्टॉपजवळ एक संशयित विनानंबरची चोरीची मोटारसायकल घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने व त्याचा साथीदार शहजाद अहमद शकिल अहमद उर्फ शहजाद गुजी (रा. गोल्डन नगर, मालेगाव) यांनी मिळून टेहरे (ता. मालेगाव) येथून ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्यांनी मालेगाव शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणांहून एकूण 11 मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले. या चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी शोएब अन्सारी फय्याज अहमद उर्फ पाप्या चोरखा (वय 31, रा. जाफरनगर, मोहम्मद अली रोड, मालेगाव) याच्याकडे दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरखा यास ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून तीन हिरो एचएफ डिलक्स, तीन होंडा युनिकॉर्न, दोन होंडा शाईन, एक होंडा अॅक्टिव्हा, एक यामाहा एफझेड आणि एक हिरो सीडी डॉन अशा एकूण 11 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे मालेगाव छावणी व पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी शोएब अन्सारी हा साथीदारांकडून चोरीच्या दुचाकी खरेदी करून कमी दरात विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
संबंधित संशयितास मालेगाव छावणी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, फरार संशयित शहजाद गुजी याचा पोलीस पथक शोध घेत आहेत. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मालेगाव पोलिसांचे आवाहन
या कारवाईत जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात ठेवल्या आहेत. ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात संपर्क साधून खात्री करावी, तसेच नागरिकांनी जुनी दुचाकी खरेदी करताना मूळ कागदपत्रांची पडताळणी करूनच व्यवहार करावा. विनानंबरप्लेट अथवा बनावट नंबरप्लेट लावून कमी दरात दुचाकी विक्रीस आणणार्या संशयित व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असेही आवाहन
केले आहे.
11 two-wheeler theft cases busted in Malegaon