नाशिक : देवयानी सोनार
दाम असेल तर होईल सरकारी काम असे म्हणण्याची वेळ आता नाशिककरांवर आलेली आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार नाशिकचा लाचखोरीत वरचा क्रमांक लागला असून, नाशिक जिल्ह्यात वर्षभरात विविध खात्यांतील 174 जणांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. लाच घेणार्यांत पोलिस,महसूल,शिक्षण विभाग अव्वल स्थानावर असल्याचे चित्र आहे.
वर्षभरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात एकूण 129 केसेस दाखल झाल्या आहेत. लाच घेताना तब्बल 174 अधिकारी, कर्मचारी, पोलीस, तलाठी,मंडलअधिकारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातही सर्वांत जास्त लाच घेणार्यांत पोलिस विभागाचाच क्रमांक वरचा असून, तब्बल 36 केसेस या पोलीस खात्यातील आहेत. त्याखालोखाल महसूल,कृषी,जिल्हा परिषदेचा नंबर लागतो.
नाशिक,नगर,धुळे,नंदुरबार,जळगाव विभागातील वर्ग दोन,तीन क्लर्क,शिपाई, लोकसेवक,इतर लोकसेवक,सरकारी लोकसेवकांचे खासगी व्यक्तींचे प्रमाण जास्त आहे.
पोलिस,महसूल,जिल्हा परिषद, भूमी अभिलेख,पंचायत समिती,कृषी विभाग,वनविभाग,महानगरपालिका,पाटबंधारे,आरोग्य विभाग,सहकार,परिवहन (आरटीओ),आदिवासी विकास विभाग,शिक्षण विभाग अशा एकूण पंचेचाळीस विभागात लाचखोर आढळून आले.
नागरिकांच्या अडलेल्या शासकीय कामांसाठी चिरीमिरी किंवा मोठी रक्कम देऊन कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच मागीतली जाते. बर्याचदा लाच देऊनही काम न झाल्याने वैतागलेला तक्रारदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जातो. त्यानंतर सापळे रचले जातात. योग्य पुरावे आणि साक्षीदारांच्या समक्ष हा सापळा लावून लाच घेणार्याला रंगेहाथ पकडले जाते.त्यानंतर पुढील कारवाई केली जाते.
वर्षभरात नाशिक विभागात चाळीस सापळे लावण्यात आले. नगर विभागात 35,धुळे 14,नंदूरबार,7,जळगाव 33 असे एकूण 129 सापळे लावण्यात आले.नाशिक विभागानंतर नगर आणि जळगावचा लाच खोरीत नंबर लागतो.तर सर्वात कमी नंदूरबार येथे केवळ सात सापळे लावण्यात आले होते.
लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यानुसार लाचखोरीच्या प्रकरणात अटक होवून 24 तास पोलिस कोठडीत असलेल्या कर्मचार्यांना निलंबित करण्यासाठी संबधित विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. मात्र, तरीही संबधितांवर कारवाईसाठी प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे.
अशी प्रकरणे..
नाशिक – 40
नगर – 35
जळगाव – 33
धुळे – 14
नंदुरबार – 7
फलक नावालाच
प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये लाच मागीतल्यास नागरिकांना तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक असणारा फलक मोठ्या दिमाखात झळकत असतो. मात्र नागरिकही आपल्या कामाची अडवणूक होऊ नये या भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
मोदींच्या वचनाला हरताळ
ना खाउंगा ना खाने दुंगा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वचन आहे. मात्र, सरकारी कार्यालयांमध्ये बर्याचदा कामाची अडवणूक केली जाते. मग काम पूर्ण करुन घेण्यासाठी लाचेची मागणी केली जाते. नाशिक विभागात बहुतांश प्रकरणांत तलाठी, भूमिअभिलेख, पोलीस, महसूल या विभागांत लाचखोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे एकप्रकारे मोदींच्या वचनाला हरताळ फासणारेच ठरत आहे.
चाळीस केसेस दाखल झाल्याने नाशिक लाचखोरीत सर्वांत पुढे असल्याचे चित्र आहे.कोणीही सरकारी कामासाठी पैसे मागितल्यास तात्काळ टोल फ्री नंबरवर(1064) किंवा कार्यालयाशी 0253-2578230 संपर्क करावा.तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाते.सरकारी काम योग्य असेल तर विभागाद्वारे करून दिले जाते.
सुनील कडासने (अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)