सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकमध्ये चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती मोठा डिजिटल पुरावा लागला असून, तब्बल 160 जीबी डेटा जप्त करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल विशेष तपास पथकाकडे सादर करण्यात आला आहे. तपासादरम्यान तीन पेनड्राइव्हमधील 32 जीबी डेटा, त्यातील 19 फोल्डर्स, 64 जीबी क्षमतेचा ओटीजी पेनड्राइव्ह तसेच एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. या सर्व उपकरणांमधून एकूण 160 जीबीपेक्षा अधिक माहिती मिळाली असून, सायबर व फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तिची सखोल तपासणी सुरू आहे.
या डिजिटल पुराव्यांमधून नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील समोर आला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात आले. तपास यंत्रणांनी पुराव्यांचे ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा गटांमध्ये वर्गीकरण केले असून, ‘ए’ गटातील माहिती अत्यंत संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जात असून, न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुरावे संकलित केले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील तिसर्या गुन्ह्यात अशोक खरात याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोप न्यायालयात मांडण्यात आला.
याच प्रकरणात शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाला जबाबासाठी नोटीस बजावली आहे. शिर्डी येथे दाखल सावकारी प्रकरणाच्या तपासात समता पतसंस्थेतील अनेक खात्यांमध्ये अशोक खरात याचे नॉमिनी म्हणून नाव असल्याचे उघड झाले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाच्या नावावरही समता पतसंस्थेत चार खाती असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत 33 खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एकूणच डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यात पोहोचले असून, येत्या काळात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
160 GB data seized in Ashok Kharat case