माळेगाव एमआयडीसीत महिला उद्योजिकेची फसवणूक; तिघांवर गुन्हा
सिन्नर : प्रतिनिधी
गव्हाचा तब्बल 18 हजार 633 किलो आटा घेऊन त्याचे 5 लाख 36 हजार 640 रुपये न देताच पोबारा केल्याचा प्रकार माळेगाव एमआयडीसीत समोर आला आहे. मालाची रक्कम मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने महिला उद्योजिकेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
सिन्नर नगरपालिकेच्या आरोग्य सभापती ललिता दत्तात्रय हांडे (39, रा. हांडेमळा, गंगावेस, सिन्नर) यांची माळेगाव एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक बी-250 येथे ‘साई ग्रो फूड इंडस्ट्रीज’ कंपनी आहे. या कंपनीत ‘न्यू किसान गोल्ड चक्की नॅचरल फ्रेश आटा’ तयार करून विक्री केला जातो. पोलिसांच्या माहितीनुसार, शोयब मोहम्मद रफिक केरुवाला (रा. भिवंडी) याने ‘लॉझिनाटेक्स (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेड’च्या नावाने 7,500 किलो आटा, 2 लाख 31 हजार 30 रुपये किमतीचा खरेदी केला. त्यानंतर दलाल केतन मेहता (रा. बोरिवली, मुंबई) याने हसमुख सावला (रा. अनुसया ट्रेडिंग कंपनी, भिवंडी) याच्याशी संगनमत करून 334 बॅग अर्थात 11 हजार 133 किलो आटा, 3 लाख 5 हजार 610 रुपये किमतीचा खरेदी केला. दोन्ही व्यवहारांमध्ये माल ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी हांडे यांना एकूण 5 लाख 36 हजार 640 रुपये दिले नाहीत. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी शोयब केरुवाला, केतन मेहता आणि हसमुख सावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
18,000 kg of flour taken; swindled out of ₹5.25 lakh!