217 संवेदनशील मतदान केंद्रे; प्रशासनाचा कडेकट बंदोबस्त

मालेगाव महापालिका निवडणूक; यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. शहरातील एकूण 609 मतदान केंद्रांपैकी 43 इमारतींमधील 217 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
प्रचाराचा जोर वाढत असतानाच पोलिस प्रशासनाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे.संवेदनशील मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. दि. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांचा संवेदनशील यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील चार इमारतींमधील 48 मतदान केंद्रे सर्वाधिक संवेदनशील असून, मालेगाव कॅम्प पोलिस ठाणे हद्दीतील नऊ इमारतींमधील 46, पवारवाडी पोलिस ठाण्यातील सहा इमारतींमधील 37, शहर पोलिस ठाणे हद्दीतील चार इमारतींमधील 31, आयशानगर पोलिस ठाण्यातील चार इमारतींमधील 21, तर किल्ला पोलिस ठाणे हद्दीतील सहा इमारतींमधील 21 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून नोंदविण्यात आली आहेत.
मतदानाच्या दिवशी सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, त्यासाठी 2,300 पोलिसांचा प्रस्ताव उच्चस्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या बंदोबस्तात 1,500 पोलिस कर्मचारी व 800 होमगार्ड यांचा समावेश असून परिस्थितीनुसार अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक संवेदनशील मतदान केंद्रांबाबत कारणेनिहाय नोंद ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये मिश्रवस्ती, यापूर्वी झालेले दोन समाजांतील वाद, गर्दीची ठिकाणे, मतदान केंद्राजवळ माजी नगरसेवकांचे निवासस्थान, तसेच पक्षीय कार्यालये व कार्यकर्त्यांची उपस्थिती अशा बाबींचा समावेश आहे.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये ‘तिसर्‍या डोळ्याची’ नजर ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार 12 अतिसंवेदनशील ठिकाणी एकूण 48 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, एका ठिकाणी चार कॅमेरे याप्रमाणे व्यवस्था असेल. निवडणुकीच्या आठ दिवस आधी हे कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून सर्व घडामोडींचे रेकॉर्डिंग होणार आहे. यापूर्वीच शहरात पोलिस प्रशासनाकडून 153 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यास पूरक म्हणून अतिरिक्त कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदान केंद्रांच्या इमारतींची पाहणी

आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील गांधीनगर चौक, रौनकाबाद चौक, फतेह मैदान, मुशावरत चौक, किल्ला पोलिस ठाणे हद्दीतील सिद्धार्थवाडी मनपा शाळा क्रमांक 16, शहर पोलिस ठाणे भागातील सर्व्हे नंबर 55 जवळील सार्वजनिक शौचालय परिसर, आयशानगर पोलिस ठाण्यातील सर्व्हे नंबर 78 कब्रस्थान परिसर, रमजानपुरा पोलिस ठाण्यातील पाच पंजतन चौक, वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीतील संविधान नगर, पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीतील मालेगाव हायस्कूल, 60 फूट रोड व गुलशेरनगर गल्ली नंबर 15 या भागात हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांनी विविध मतदान केंद्रांच्या इमारतींची पाहणी करून नियोजनकामी अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

217 sensitive polling stations; strict security arrangements by the administration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *