नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे., नाशिक जिल्ह्यातील 23 हजार 798 शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत.प्रशासनाने लाभार्थी शेतकर्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. शासनाकडून निकषानुसार मंजुरी करून शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळसदृश परिस्थिती आणि बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अनेक भागांत फळबागा, भाजीपाला, कांदा, द्राक्षे आणि इतर नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकर्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
यंदाच्या खरीप हंगामातही जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकर्यांनी पेरणी केली असली तरी पावसाअभावी बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता असून त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीची घोषणा शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर जल्ह्यातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी प्रत्यक्ष लाभ लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कर्जमाफीसोबतच पीकविमा, नुकसानभरपाई, सिंचन सुविधा आणि शेतीमालाला हमीभाव यांसारख्या प्रश्नांवरही शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
अंतिम मंजुरीची प्रतीक्षा
नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांची माहिती संकलित करून प्रशासनाने 23 हजार 798 लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. शासनाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकर्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निर्णयामुळे शेतकर्यांवरील कर्जाचा काहीसा भार कमी होऊन आगामी शेती हंगामासाठी आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
23,798 farmers in the district to receive the benefit of loan waivers.