सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश
उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पुन्हा धक्का देत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटात प्रवेश करताच सचिन अहिर यांनी थेट उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. या एकाच खेळीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अचानक बदलली असून, ठाकरे गटाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
सचिन अहिर यांच्या या सोडचिठ्ठीमुळे थेट आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकेकाळी वरळीचे प्रतिनिधित्व करणारे आणि तळागाळात दांडगा जनसंपर्क असलेले सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीत अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ होते. त्यांनीच आदित्य ठाकरेंसाठी आपला मतदारसंघ सोडला होता. आता अहिर यांनीच साथ सोडल्यामुळे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी त्यांना एक ‘तळागाळातील आणि लोकांशी जोडलेला नेता’ असे संबोधले. अहिर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच, ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना शिंदे यांनी आम्ही खूप कष्टातून आणि संघर्षातून इथवर आलो आहोत आणि आम्हीच खर्या अर्थाने शिवसेना उभी केली आहे, असे विधान केले. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही अहिर यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटासाठी मोठा फटका असल्याचे म्हटले आहे. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आपला अत्यंत विश्वासू सहकारी गमावल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी या राजकीय घडामोडीला शिंदे यांचे ’ऑपरेशन टायगर’ न म्हणता थेट ’ऑपरेशन देवेंद्र’ असे नाव दिले आहे. यामागे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचीच रणनीती असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला असून, या संपूर्ण घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही शिवसेना गटांमधील संघर्ष अधिकच टोकदार झाला आहे.
जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पाहावी?
उपसभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी आज अर्ज भरला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी आपला फोटो समाज माध्यमांवर शेअर करत कवी सुरेश भट यांच्या ’उषःकाल होता होता’ या कवितेतील काही ओळी लिहिल्या आहेत. राऊतांनी फोटोसोबत लिहिलंय की, आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पाहावी? (पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावेे?)
जी योग्य कारवाई असेल ती करणार
सचिन अहिर यांना उपसभापतिपदावर बसवलं. का नाही भाजपवाला बसवला? हे उपरे बसवता आहात तुम्ही? जी योग्य कारवाई असेल ती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचे कार्यकर्ते घरदार सोडून गेलेले आहेत. त्यांना का पदं दिली जात नाहीत? आम्ही ज्यांना ज्यांना शब्द दिला तो पाळला. तुम्ही निष्ठा पाळता आहात की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही वचनाला जगू नाही शकला, हा तुमचा प्रश्न आहे. मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर पंख छाटण्याचे काम सुरू आहे. शिवराजसिंह चौहान यांचे पंख छाटण्याचे काम झाले. अशात फडणवीस यांचेदेखील पंख छाटले जातायत, हे दिसतंय. संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळत होते, ते काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही आदित्य म्हणाले.