कैद्यांना विक्रीसाठी आणल्याचा संशय; गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये टेपने गुंडाळून ठेवला होता अमली पदार्थ
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
कैद्यांवर नजर ठेवण्याची आणि कारागृहाची सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचार्याच्याच अंगावर चरस आढळल्याने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. कैद्यांना विक्री करण्याच्या उद्देशाने तब्बल 33 ग्रॅम चरस कारागृहात आणल्याचा संशय असून, संबंधित कर्मचार्याने हा अमली पदार्थ गुप्तांगाजवळ अंडरपॅन्टमध्ये काळ्या चिकट टेपने गुंडाळून लपविला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या विशेष अंगझडतीत हा प्रकार उघडकीस आला. रवींद्र एकनाथ पाटील (वय अंदाजे 35) असे संशयित कर्मचार्याचे नाव आहे.
4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कारागृह रक्षक नारायण जयसिंग राजपूत आणि धनराज चव्हाण हे झडतीची जबाबदारी सांभाळत होते. याचदरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार कारागृहात प्रवेश करणार्या कर्मचार्यांची विशेष अंगझडती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वसंत मारोती चौधरी आणि जनरल सुभेदार विकास भरते यांच्या उपस्थितीत रवींद्र पाटील याच्यासह चार कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली. या झडतीदरम्यान पाटील याच्या अंडरपॅन्टची तपासणी केली असता गुप्तांगाजवळ काहीतरी लपविल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासणी केली असता काळ्या चिकट टेपमध्ये गुंडाळलेली वस्तू आढळून आली. ती उघडून पाहिली असता त्यात चरस असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराची माहिती तत्काळ वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव यांना देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत पाटील याने संबंधित पदार्थ चरस असून, त्याचे वजन अंदाजे 33 ग्रॅम असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.
कारागृह अधीक्षकांनी हा चरस कोणाकडून विकत घेतला आणि कारागृहातील कोणत्या कैद्याला देण्यासाठी आणला होता, याबाबत विचारणा केली. मात्र, पाटील उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट पुढील तपास करीत आहेत.
33 grams of charas (cannabis resin) discovered during a search by a guard at the Nashik Road prison!