सिंहस्थात साधुग्राममध्ये 24 तास पाणी 375 कोटींचा मुकणे प्रकल्प

नऊ किमीचे काम पूर्ण 2055 पर्यंत शहराच्या पाण्याचे नियोजन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुकणे पाणी प्रकल्पाचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मार्गी लावण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. तब्बल 375 कोटी रुपये खर्चून या प्रकल्पाद्वारे 274 एमएलडी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यामुळे शहराची पुढील 30 वर्षे पाण्याची सोय होणार असल्याने हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. दरम्यान, एकूण 23 किमीपैकी आतापर्यंत नऊ किमीचे काम पूर्ण झाले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीनेदेखील या प्रकल्पाचे महत्त्व अधिक आहे. या प्रकल्पाद्वारे थेट विल्होळी ते साधुग्रामपर्यंत गुरुत्ववाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याकरिता साधुग्राममधील आखाड्यांना चोवीस तास पाणी पुरवले जाणार आहे. शहरातील नव्याने विकसित होणार्‍या भागांसह नागरिकांना भविष्यात 24 बाय 7 अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. या प्रकल्पाद्वारे सार्वजनिक पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. यात मुख्यत: पाइपलाइन उभारणी करून, विल्होळी ते निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र (डब्ल्यूटीपी) संतुलित जलसाठ्याचे नियोजन केले जाणार आहे. विल्होळी ते इंदिरानगरपर्यंत 1800 मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचे काम झाले आहे. आता इंदिरानगर ते तपोवनातील लक्ष्मीनारायण ब्रीजपर्यंत 1400 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली जाणार आहे. तेथून पुढे म्हणजेच लक्ष्मीनारायण ब्रीज ते निलगिरी बागपर्यंत बाराशे व्यासाच्या लाइन टाकण्यात येईल. या प्रकल्पामुळे संपूर्ण शहरात 24 बाय 7 अखंड आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. पुढील तीस वर्षांसाठी शहराची जलसुरक्षा मजबूत होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाद्वारे 49 टक्के पाणीगळतीचे प्रमाण कमी करून ते 20 ते 25 टक्क्यांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे.

निधीची उभारणी
महापालिकेने 25 फेब्रुवारीला प्रथमच दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड सार्वजनिकरीत्या जारी करून हरित वित्त व्यवस्थापन क्षेत्रात पाऊल उचलले. यातून दोनशे कोटींचा निधी मुकणे प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहे. 75 कोटी अर्बन चॅलेंज फंड, 100 कोटी सिंहस्थ प्राधिकरण आणि उर्वरित राज्य शासनाकडून निधीची पूर्तता केली जाईल.

मुकणे प्रकल्पामुळे पुढील तीस वर्षे शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था होईल. आतापर्यंत नऊ किमीपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, सिंहस्थापूर्वी जून 2027 पर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे काम मार्गी लावले जाईल.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक, पाणीपुरवठा, मनपा

375-crore Mukane project to provide 24-hour water supply to the Sadhu-gram during Simhastha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *