जिल्ह्यातील 397 नागरिक सुरक्षितस्थळी

141 गरोदरमाता आरोग्य संस्थांत दाखल, 116 रुग्णवाहिका सज्ज

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील 397 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये सिन्नर तालुक्यातील 42, नाशिक तालुक्यातील 118, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 179, नांदगाव तालुक्यातील 45 आणि दिंडोरी तालुक्यातील 13 नागरिकांचा समावेश आहे.
दुर्गम व अतिसंवेदनशील भागांतील गरोदर महिलांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 116 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून
कार्यरत आहेत.
दरम्यान, अपेक्षित प्रसूती दिनांक पुढील दोन दिवसांत असलेल्या गरोदरमातांची विशेष खबरदारी घेत जिल्हाभरातील आरोग्य संस्थांमध्ये त्यांना आगाऊ दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 141 गरोदरमाता विविध आरोग्य संस्थांमध्ये दाखल असून, त्यापैकी 59 माता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, 37 माता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयांमध्ये, तर 45 माता इतर उच्चस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. आतापर्यंत 44 मातांची सुरक्षित प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली आहे.
अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील 1,029 कोल्हापूर टाइप (के.टी.) बंधारे आणि 2,991 सिमेंट बंधारे, अशा एकूण 4,020 लहान बंधार्‍यांचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात
आले आहेत.
पुढील काळातदेखील जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अतिवृष्टीच्या परिस्थितीवर सातत्याने नियंत्रण ठेवण्यात येत असून, सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि लघुपाटबंधारे विभागामार्फत समन्वयाने उपाययोजना करण्यात येत आहेत. पुढील काळातदेखील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक

 

397 citizens from the district moved to safe locations.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *