तिन्ही कालव्यांना आवर्तन; आठ तालुक्यांना दिलासा
करंजी खुर्द : प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांच्या उघडिपीनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. यामुळे गंगापूर, दारणा, भावली व पालखेड या धरणांमधून पाणी सोडण्यात येत असून, नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी (दि. 22) या धरणातून गोदावरी नदीपात्रात 4,760 क्यूसेकने, तर तीन कालव्यांद्वारे 1,550 क्यूसेक असा एकूण 6,310 क्यूसेक विसर्ग सुरू होता.
धरणाचे दोन वक्र दरवाजे एक मीटरने उचलून हे पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवला जाईल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता नितीन मुठाळ यांनी दिली. या पाण्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी या धरणातून जायकवाडीच्या दिशेने तब्बल 105.20 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.
धरणात आवक वाढल्याने डावा, उजवा व एक्स्प्रेस या तिन्ही कालव्यांना खरिपाचे पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनाचा फायदा नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील शेतीला होणार आहे.
निफाड तालुक्यात 94.29 टक्के पेरण्या पूर्ण
जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. मात्र, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे 15 जुलैपर्यंत 80.5 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पावसाची संततधार कायम राहिल्याने 22 जुलैपर्यंत तालुक्यात 94.29 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
4,760 cusecs of water discharged from Nandur Madhyameshwar