बागलाण, मालेगाव तालुक्यांचा पाणीप्रश्न सुटला
नामपूर : वार्ताहर
बागलाण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हरणबारी धरण पूर्णक्षमतेने भरले असल्याची अधिकृत माहिती जलसंपदा (इरिगेशन) विभागाकडून देण्यात आली आहे.
चालू वर्षी मोसम खोर्यात सुरुवातीला फारसा पाऊस झाला नव्हता. दोन-तीन दिवसांपूर्वी कडक ऊन असल्याने पेरणी केलेली कोवळी पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती. मात्र, दोन दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. बागलाण व मालेगाव तालुक्यांसाठी वरदान ठरलेले हरणबारी धरण भरल्यामुळे मोसम नदीकाठच्या शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, विहिरी व कूपनलिकांच्या भूजल पातळीत वाढ होणार आहे.
हरणबारी धरण परिसरात जंगल आणि डोंगरदर्या असल्याने दरवर्षी हे धरण पूर्ण भरते. मात्र, धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी धरणाचे रुंदीकरण/खोलीकरण करून त्यातील गाळ काढण्यात यावा, जेणेकरून दोन्ही तालुक्यांतील शेतकर्यांना याचा अधिक फायदा होईल, अशी मागणी नामपूर बाजार समितीचे संचालक सयाजी देवरे, विलास सावंत, गिरीश भामरे, के. पी. कापडणीस, दीपक पगार व प्रवीण अंबासनकर यांनी
केली आहे.
Haranbari Dam filled to full capacity.