महायुतीच्या उमेदवारासाठी भाजपचा व्हीप
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे रिंगणात असून, त्यांच्यासमोरील दोन्ही उमेदवारांंनी माघार घेऊनही महायुतीत धाकधूक दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे नगरसेवक ठाण्याला सहलीला रवाना झाले. सोमवारी (दि.15) भाजपचे 72 पैकी 52 नगरसेवक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. उर्वरित वीस नगरसेवक आज, मंगळवारी (दि. 16) रवाना होणार आहेत.
दरम्यान, दराडेंसमोरील दोन्ही उमेदवारांची माघारी झाली असूनही ही भीती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्या मनधरणीसाठी महायुतीचे मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे यांना चार-पाच दिवस धावपळ करावी लागली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील गिते यांच्याशी संपर्क साधला. मंत्र्यांच्या आग्रहानंतर गोकुळ गिते यांनी त्यांचा प्रचार थांबवला होता.पण मतपत्रिकेवर गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांचे नाव असल्याने शिंदेसेनेत काहीशी अस्वस्थता आहे. अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटचे अर्ज नेल्याने शिंदेसेना अस्वस्थ झाल्याचे बोलले जातेे. कोणताही दगाफटका होऊ नये याकरिता महायुतीने खबरदारी घेत सर्व मतदारांना ठाण्यातील एका रिसॉर्टमध्ये हलविले आहे.
केदारनी स्टेअरिंग हाती घेताच अपघात
महापालिकेची महासभा तहकुब झाल्यानंतर नगरसेवकांना खाजगी हॉटेलमध्ये आणण्यात आले. शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते ड. श्याम बडोदे यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांना पक्षादेश बजावण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी नगरसेवक बसलेल्या वाहनाचे सारथ्य करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी स्टेअरींग ताब्यात घेत वाहन चालविले मात्र हे करत असताना त्यांना अंदाज न आल्याने हॉटेल बाहेरील ओट्याचा कॉर्नरला वाहनाचा धक्का लागला. या छोट्याशा अपघातानंतर शहराध्यक्ष केदार यांनी स्टेअरींग सोडले अन् चालकाच्या हवाली केले.
राष्ट्रवादीचे ठरेना
महापालिकेत राष्ट्रवादीचे चार व एक अपक्ष असे पाच सदस्य आहेत. शिंदे सेनेकडून त्यांनाही शनिवारपासून गळ घालण्यात आली होती मात्र पक्षाच्या पदाधिकार्यांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी (दि. 15) आमदार किशोर दराडे यांनी राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांची येवला येथे भेट घेतली. मात्र त्या भेटीनंतरही नगरसेवक सहलीला रवाना झाले नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक सहलीला कधी रवाना होणार याबाबत अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही.
पक्षाचे 52 नगरसेवक ठाण्याला रवाना झाले असून, उर्वरित नगरसेवक आज (दि. 16) प्रस्थान करतील. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदान करावे, याबाबतचा पक्षादेश काढण्यात आला आहे.
– सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप
52 BJP corporators head to Thane; BJP issues whip for Mahayuti candidate.