‘ऑपरेशन मुस्कान 14’अंतर्गत 54 पीडित बालकांची सुटका

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरात बालकामगार व भिक्षेकरी बालकांविरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान 14’अंतर्गत 54 पीडित बालकांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत बालकामगार ठेवणार्‍या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहरातील विविध ठिकाणांहून भिक्षा मागणार्‍या बालकांनाही सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे.
या मोहिमेदरम्यान विविध आस्थापनांमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी बालकांना कामावर ठेवून त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करणार्‍या चालकांविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सात बालकामगारांची सुटका करण्यात आली. तसेच शहरातील विविध सिग्नल, चौक व सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणार्‍या 47 बालकांची सुटका करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 54 पीडित बालकांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने यापैकी 27 बालकांना आधाराश्रमात ठेवण्याचे आदेश दिले असून, उर्वरित 27 बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 मोनिका राऊत, परिमंडळ-2 किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके, तसेच पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड विभागातील सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार व सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

54 child victims rescued under ‘Operation Muskan 14’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *