हनुमान नगरमध्ये ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू; मुलावर संशय

नाशिक (दिलीपराज सोनार) : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर परिसरात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कमळाबाई अनाजी वळवी (६५) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मुलावर या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मोतीवाला कॉलेजच्या पाठीमागील हनुमान नगर परिसरात ही घटना रात्री घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कमळाबाई वळवी यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणात कमळाबाई यांचा मुलगा तानाजी अनाजी वळवी (४०) याच्याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडली त्यावेळी दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली, तरी याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण तसेच घटनेचे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गंगापूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

65-year-old woman dies in Hanuman Nagar; son suspected.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *