♠ खरेदीसाठी विविध ठिकाणी गर्दी
♠ ढोल गजराने शहर दुमदुमले
♠ गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ
♠ यंदा बारा दिवस उत्सव
♠ पाऊस असून उत्साह कायम
नाशिक : प्रतिनिधी
’मंगलमूर्ती मोरया…’, ’आला रे आला गणपती आला’, असा जयघोष करत लाडक्या गणरायाचे सोमवारी (दि. 14) भक्तांनी मोठ्या जल्लोेषात स्वागत करत घरोघरी प्रतिष्ठापना केली. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरवर्षीच बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते. यंदाही गणरायाचे जल्लोेषात घरोघरी आगमन झाले. भक्तिभावाने पूजा, मंत्रोच्चार करत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गर्दी झाली होती. बाप्पाच्या स्वागत मिरवणुका, नाशिक ढोल गजराने शहर दुमदुमून निघाले होते.
गणपती प्रतिष्ठापनेसाठीचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 21 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत होता. मात्र, शुभ मुहूर्तानंतरही गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आली. कोणतीही कसर राहू नये म्हणून भाविक प्रयत्न करत होते. शहरात दिवसभर गणरायाच्या नावाचा जयघोष सुरू होता.
बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला
गणरायाच्या स्वागतासाठी बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गणपती हे दैवत लहानग्यांचे अगदी आवडीचे असल्याने त्यांच्या फ्रेंड गणेशाचे आगमन झाल्याने आणि मोदकाच्या प्रसादाने आनंद द्विगुणित झाला होता. अनेक चिमकुल्यांनी बाप्पाला हातात घेण्याचा आग्रह धरल्याने गणेशमूर्ती स्टॉलवर लोभसवाणे दृश्य पाहावयास मिळत होते.
खड्डयांमुळे गणरायाच्या स्वागताची वाट बिकट
दहा दिवसांच्या गणपतीचे उत्साहात आगमन झाले. मात्र, दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. पावसामुळे काही स्टॉलसमोर आणि रस्त्यावर चिखल झाल्याने गणरायाच्या स्वागताची वाट बिकट झाली होती. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने बाप्पाला घरी नेताना गणेशभक्तांना बाप्पाची विशेष काळजी घ्यावी लागली.
सेल्फी विथ बाप्पा
गणपतीची मूर्ती खरेदी केल्यानंतर स्वागत आणि प्रतिष्ठापनेपर्यंत बाप्पासोबत फोटो काढण्यात येत होते. अनेकांनी बाप्पासोबत सेल्फी काढत बाप्पाचे स्वागत केले. गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतरही स्टेट्स, रील्सच्या माध्यमातून गणरायाचा जयघोष करण्यात आला. स्टेट्स, डीपीवर बाप्पाचे फोटो झळकले. प्रत्येकाने आपला घरचा बाप्पा स्टेटसला ठेवत गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाल्याचे चित्र होते.
Enthusiastic welcome for Bappa; Lord Ganesha installed in homes.