शहरात 7.7 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात मंगळवारी (दि. 30) पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शहरात दिवसभरात 7.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संपूर्ण जूनमध्ये नाशिक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत. मात्र, आता जूनच्या शेवटच्या दोन दिवसांत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे.
जूनमध्ये मुबलक पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असला, तरी दमदार पावसाची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून शेतकर्‍यांना करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 2 व 3 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अथवा तुरळक सरींचा अंदाज आहे. या कालावधीत पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट
केले आहे.

जिल्ह्यातील धरणांत 19.79 टक्के साठा

जिल्ह्यातील धरणसमूहात 19.79 पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 31.83 टक्के साठा आहे. जिल्ह्यातील धरणांतील पाणीपातळी कमी होत असल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत.

साडेतीन लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील 698 गावे व वाड्यांतील तीन लाख 45 हजार 870 लोकसंख्येला 197 टॅँकरद्वारे 421 टँकरफेर्‍यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नांदगाव तालुक्यातील सर्वाधिक 240 गावांना 38 टँकरद्वारे 76 टँकरफेर्‍यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

7.7 mm of rainfall recorded in the city.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *