मनमाड : प्रतिनिधी
मनमाड येथील एका नामांकित शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये अचानक धामण जातीचा साप आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र, सर्पमित्र विजय उगले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे बाहेर काढल्याने संभाव्य अनर्थ टळला. त्यानंतर सापाला जंगलात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॅनचालक विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असताना त्याला वाहनात साप असल्याचा संशय आला. तपासणी केली असता व्हॅनमध्ये साप दिसून आल्याने चालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच सर्पमित्र विजय
उगले यांनी कौशल्याने
साप पकडला. उगले यांनी सांगितले की, पकडलेला साप धामण जातीचा असून, तो बिनविषारी आहे. पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी साचल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात. नागरिकांनी वाहन सुरू करण्यापूर्वी तपासणी करावी तसेच साप आढळल्यास घाबरून न जाता सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन
त्यांनी केले.
Sensation as snake found in moving school van