कढीचे प्रकार

ताकाची कढी :
आंबट ताकात आले, कढीलिंबाची पाने आणि हिरव्या मिरचीचे झेपतील तेवढे तुकडे घालणे. चवीप्रमाणे मीठ, किंचित साखर, हळद घालणे. थोडे ओले खोबरे आणि कोथिंबीर घालणे. वरून तुपात हिंग जिर्‍याची फोडणी करून घालणे आणि फुटणार नाही अशा बेताने उकळणे. यात थोडा वेगळा प्रकार म्हणजे आल्याच्या तुकड्यांऐवजी आले लसणीची पेस्ट घालून कढी होते किंवा ताकात 2 चमचे बेसन कालवून घालून वेगळ्या पद्धतीची कढी करता येते. बेसन घातल्यामुळे कढीला थोडा दाटपणा येतो. मात्र चव बदलते.
ताकतव ः
ताकात हिरवी मिरची तुकडे करून, कोथिंबीर चिरून घालणे, मीठ साखर घालणे आणि वरून तुपात जिरे, मोहरी, हिंग आणि कढीलिंबाची पाने घालून फोडणी देणे. हे फार वेळ तापवायचे नाही.
सुंठीची कढी :
सुंठ उगाळून किंवा सुंठीची पूड थोडी ताकात घालणे. त्यात हिंग, मीठ, सैंधव, पादेलोण घालणे. मंद विस्तवावर उकळणे. गरमागरम कढी अतिशय उत्तम पाचक समजली जाते. किंवा थंडीत अशीच सूपसारखी प्यायलाही छान लागते.
जिर्‍या-मिर्‍याची कढी :
जिरे, मिरे, लसूण पाकळ्या (एक गड्डी) हिरव्या मिरच्या हे सर्व तुपात भाजून घेणे. त्यात एका नारळाच्या वाटीचे ओले खोबरे घालून वाटणे. त्यात 7/8 ओट सोले किंवा चिंच घालणे. मीठ व पुरेसे पाणी घालून उकळणे. वरून तुपात लसणीची फोडणी देणे.

लसूण पावडर

लसणीची कढी :
वर दिल्याप्रमाणेच. फक्त जिरे, मिरे न घालता फक्त लसणीचे 2 गड्डे आणि 3/4 सुक्या मिरच्या, चिंच, एका नारळाच्या वाटीच्या खोबर्‍यावत वाटणे. मीठ घालणे. वरून तुपात मोहरी, हिंग, कढीलिंब पाने आणि लसणीची फोडणी देऊन उकळणे.
विड्याच्या पानांची कढी :
6 विड्याची पाने, जिरे, मिरे, हिरव्या मिरच्या, लसणीच्या 4 पाकळ्या तुपावर भाजून घेऊन चिंच व एका नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याबरोबर वाटणे. मीठ घालून उकळणे. तुपात हिंग, मोहरी, लसूण कढीलिंबाची पाने यांची फोडणी घालणे.
तिरफळांची कढी :
8/10 फिरवी तिरफळे तुपात भाजून घेणे. 2/3 ओल्या मिरच्या, भाजलेली तिरफळे चिंच व एक नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याबरोबर वाटणे. मीठ घालून उकळणे. मोहरी, हिंग, कढीलिंब पाने तुपात घालून फोडणी देणे.
थंड कढी : सोलकढी :
7/8 आमसुले थोडावेळ भिजत घालून ते पाणी किंवा 2 चमचे आगळ मिसळलेले पाणी घेणे. (आगळ घातले तर चव थोडी वेगळी लागते. पण आमसुले भिजत ठेवायला वेळ नसेल तर इलाज नाही) त्यात एका नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याचे जाड व पातळ दूध घालणे. नारळाचे दूध काढताना 4 लसणीच्या पाकळ्या वाटून घालणे. मीठ घालून नीट ढवळणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *