जिल्ह्यात 99.84 टक्के मतदान

विधान परिषद : 619 पैकी 618 मतदारांनी बजावला हक्क

नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत तब्बल 99.84 टक्के मतदान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील एकूण 619 मतदारांपैकी 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर केवळ एक मतदार मतदानापासून दूर राहिला, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे आदी
उपस्थित होते.
जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, निफाड, येवला, चांदवड, कळवण आणि बागलाण या आठ केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. तर मालेगाव केंद्रावर 84 पैकी 83 मतदारांनी मतदान केल्याने 98.81 टक्के मतदान नोंदविण्यात आले.
मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार 300 पुरुष आणि 319 महिला असे एकूण 619 मतदार होते. त्यापैकी 299 पुरुष आणि 319 महिलांनी मतदान केले. त्यामुळे महिला मतदारांची उपस्थिती शंभर टक्के राहिली, तर पुरुष मतदारांपैकी केवळ एक मतदार अनुपस्थित राहिला.
नाशिक केंद्रावर 146, दिंडोरी 37, इगतपुरी 47, निफाड 110, येवला 88, मालेगाव 83, चांदवड 41, कळवण 38 आणि बागलाण केंद्रावर 28 मतदारांनी मतदान केले.
नाशिक शहरातील मतदान केंद्रांवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली तर ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या नेतृत्वात पोलीस यंत्रणेने यशस्वीपणे बंदोबस्त पार पाडला. यादरम्यान निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर यांनी नाशिक तहसील कार्यालयातील मतदान केंद्रासह जिल्ह्यातील अन्य मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. मतदान संपल्यानंतर थोड्याच वेळात सर्व मतपेट्या जमा करण्यात आल्या. संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही.

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
एकूण 618 मतदार मतदानास पात्र असल्याने विजयासाठी 310 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणीसाठी मतपेट्या रिकाम्या करून 2-2 चे बंडल तयार करून प्रत्येक टेबलवर वाटप करण्यात येणार आहे. बंडल उघडून मोजणीनंतर पुन्हा बांधण्यात येतील. प्रथम पसंतीच्या मतांचा पहिला कोटा मोजण्यात येईल. पहिल्याच मोजणीत कोटा पूर्ण न झाल्यास दुसर्‍या पसंतीची मते मोजली जातील. सध्या 3 उमेदवार रिंगणात असल्याने तीन कोटा पद्धतीने मतमोजणी होईल. अपात्र मते वगळण्यात येतील. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, मतमोजणी सुरळीत झाल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होऊ शकतो. दरम्यान, मतमोजणीसाठी सोमवारी (दि. 22) सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात तयारी करण्यात येणार असून, प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले आहे.

इगतपुरीतील तक्रारीची चौकशी
इगतपुरी तालुक्यात एक गाडी घरोघरी जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी तातडीने धाव घेऊन संबंधित गाडीचा तपास केला. तपासात गाडीत 45 हजार रुपये आढळून आले. नियमाप्रमाणे 50 हजार रुपयांपर्यंतची मर्यादा असल्याने कोणताही नियमभंग आढळला नाही. प्रक्रियेत नोंद घेऊन गाडी सोडण्यात आली.

99.84% voter turnout in the district.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *