“ती” ला समजून घ्या…

डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
९८२२४५७७३२
कैक हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा या पृथ्वीवर जीवसृष्ठी होती, निसर्ग होता. पाणी, हवा, डोंगर, दऱ्या, नदी, नाले, समुद्र, आकाश, झाडे, झुडपे, फुलं, पक्षी प्राणी… असे सर्वकाही होते. फक्त काय नव्हतं, तर माणूस नव्हता. हो… त्यावेळी या धर्तीवर मानव नव्हता. ना स्त्री ना पुरुष, आणि सहाजिकच मुलं ही नसणार. मग तुम्ही म्हणाल की स्त्री, पुरुष कुठे होते? त्याकाळी ते दोघे परग्रहावर होते. तेही दोन वेगवेगळ्या ग्रहांवर. हो हे खरं आहे. तुम्ही, मी आणि आपण सर्वच जण या पृथ्वीवर परग्रहावरून आलेलो आहोत. कदाचित तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही, हे मला ठाऊक आहे. हे नीट समजून घेण्यासाठी हा लेख अवश्य वाचा,
  आपण नक्की कुठून आलो आहोत, काय आहोत, इथे कसे आलो आणि आता आपण इथे कसे जगतो आहोत. एकमेकांना काय समजतो आणि एकमेकांशी कसे वागतो आहे. चला, तर ती गोष्ट जाणून घेऊया…
जसे मी म्हणालो तसे, काही हजारो वर्षांपूर्वी आपण या पृथ्वीवर नव्हतो. त्याकाळी सर्व पुरुष शुक्रावर होते, तर स्त्रिया मंगळावर होत्या. हो, हे अगदी खरं आहे. शुक्र ग्रूहावर सर्व पुरुष एकत्र रहात होते. केवळ नावापुरते एकत्र होते, परंतु एकमेकांत फारसे काही मिसळत नसे. जो तो आपापल्या कामात दंग असायचा. रोज सकाळी उठल्यापासून कामाला लागायचा. त्याच्यासाठी तो भला, त्याचे काम भले. कोण काय करतंय, याच्याशी काहीएक देणेघेणे नसायचे.
दिवसभर कामात व्यस्त असायचे. रोजचे ठरलेले काम करणे, त्यातून रोजगार निर्मिती करणे. वेळेला खप महत्व. ठरलेले काम वेळेत झालेच पाहिजे असे म्हणत सर्वच पुरुष मंडळी दिवसरात्र स्वतःला व्यस्त ठेवायचे. अगदी गंभीर आणि शांत वातावरण असे, कुणी कुणासोबत फारसे बोलायचे नाही, विचारपूस करायचे नाही.
कधी कधी खूप थकवा आलाच तर दोन-चार डोके भेटायचे, गप्पाटप्पा, थट्टामस्करी, मद्यपान करत श्रमपरिहार करायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपापल्या कामात तल्लीन व्हायचे. मंगळ गृहाच्या अगदी विपरीत वातावरण इथे असे. ना करमणूक, ना मौजमस्ती, ना साजशृंगार, ना ही कामाव्यतिरित कुठल्या गोष्टीत रस असायचा. असे काही करणे म्हणजे वेळ वाया घालवणे अशी समज ठेवणाऱ्या सर्व पुरुषांचे जीवन जगणे सुरू होते.
इकडे मंगळ ग्रहावर सर्वच महिला होत्या. तिथलं वातावरण खूपच छान होतं. तिथला निसर्गही खूप सजलेला होता. मुबलक पाणी, झाडी, बागबगीचे, रंगबिरंगी फुलं, त्याभोवती उडणारे फुलपाखरे, पक्षी तर वावरणारे प्राणी सर्वकाही खूप मनमोहक होते. त्या सर्व निसर्गाची योग्य काळजी घेणाऱ्या आणि त्याचा आस्वाद घेणाऱ्या स्त्रिया, असे खूप छानसे वातावरण त्या मंगळ ग्रहावर असे.
त्या स्त्रियाची दिनचर्याही खूप मजेशीर असायची. रोज एकमेकींना भेटणार, खूप खूप गप्पा मारणार, खेळ खेळणार, गम्मत करणार, थट्टा मस्करी करणार. एव्हढंच नव्हे तर नेहमी भेटल्या की गाणी गाणार, नाचणार, खेळ खेळणार, चुटकुले, चारोळ्या, कविता करणार, असे मजेशीर वातावरणात वावरणाऱ्या त्या सर्व स्त्रिया. रोज स्वतःचा साज शृंगार करणार, नटणे थटणे तर खूप आवडायचे. केशभूषा, वेशभूषा, रंगबिरंगी पोशाख परिधान करणे, मेहंदी काढणे, केश रंगविणे, विविध आभूषणांनी स्वतःला सजविणे त्यांना आवडे. त्यांच्या भोवताली स्वच्छता ठेवणे, सजावट करणे, रांगोळी, फुलमाळांनी सुशोभीकरण करणे असे सगळेच नीटनेटके असे.
बाजारात जाणे, खरेदी करणे, खानपान करणे, नवनवीन पदार्थ बनविणे व त्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी वेळ खर्च करणाऱ्या सर्व त्या स्त्रिया. प्रसंगी सगळ्या जणी मिळून सण साजरे करणार, त्यानिमित्ताने भेटून खूप खूप गप्पा मारणार, स्वतःला मनसोक्तपणे व्यक्त करणाऱ्या त्या सगळ्या स्त्रिया मंगळ ग्रूहावर अगदी आनंदी, आणि खेळीमेळीच्या वातावरणात जगत होत्या.
चौकस आणि कुतूहल असे ठायी स्वभाव असणाऱ्या स्त्रियांपैकी एक स्त्री असेच दुर्बिणीने आकाशाची टेहळणी करत असताना तिला शुक्र गृह दिसला. त्यावर काहीसे आपल्यासारखे दिसणारे प्राणी दिसले. ही बातमी मंगळावर वाऱ्यासारखी पसरली. त्या गृहाची खबर घेण्यासाठी जावे असे ठरले. सर्व स्त्रिया मंगळ गृह सोडून शुक्रावर आल्या. पुरुषांना भेटून त्यांना छान वाटले. त्यांचे कौतुक वाटे, कामात मदत करू लागल्या. विचारपूस करत त्यांची काळजी घेऊ लागल्या.
काहीतरी वेगळे घडते आहे, नवीन सोबती मिळाला म्हणून पुरुषांनाही त्यांची सांगत आवडायला लागली. यात अनेक वर्षे गेली. चंचल आणि चौकस वृत्तीने एका स्त्रीने पृथ्वीचा शोध लावला. ठरले की आता आपण सर्वांनी पृथ्वीवर जायचे. असे करत सर्वच स्त्रिया आणि पुरुष मंडळींचे या पृथ्वी ग्रूहावर आगमन झाले. ते दोघे एकमेकांत रमू लागले, वावरू लागले. पृथ्वीवरील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊ लागले.
बागबगीच्यांत, समुद्र किनारी, एकांतात भेटू लागले. एकमेकांच्या संगतीचा आनंद घेत ते कधी प्रेमात पडले ते कळलेच नाही. एकमेकांची काळजी घेतली, सुख दुःख, चांगल्या वाईट गोष्टी शेअर केल्या. आणि सर्वांनी ठरवले की आता आपण कायस्वरूपी या पृथ्वीतलावरच रहायचे. अशा पद्धतीने आपण इथे एकत्र राहतो आहे.
पुढे नियतीने काहीतरी वेगळेच लिहिले आहे, याची कल्पना देखील कुणी केली नव्हती. एके रात्री जेव्हा सर्वच जण गाढ झोपेत असतांना, आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्ठा उल्कापात झाला. खूप भयानक विस्फोट झाला. अवकाशात वीज चमकू लागल्या आणि सर्वत्र शॉर्ट सर्किट झाले. प्रत्येकाच्या मेंदूत शॉर्ट सर्किट झाल्याने सर्वांचा स्मृतिभ्रंश झाला. सगळ्यांची मेमरी डिलीट झाली. सकाळी सगळे उठले, तर एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले. कोण हा? कोण ही? असे प्रश्न पडले. सगळेच जण एकमेकांसाठी अनोळखी बनले. ना ती त्याला ओळखेना ना तो तिला.
अगदी पहिल्यांदाच भेटतोय असे वाटले. आपण मूळचे परगृहावरचे आहोत हे देखील सगळे विसरले. आपण मूळचे इथलेच आहोत असाच समज निर्माण झाला, आणि तो समज आजवर तसाच कायम आहे. आजही त्याला आश्चर्य वाटते की ती अशी का आहे आणि ती अशी का वागते? आणि तिलाही कळत नाही की मी काय सांगते हे त्याला कसे कळत नाही? कारण खूप स्पष्ट आहे, की स्त्री आणि पुरुष मुळात भिन्न आहेत. त्यांची  उत्पत्ती, त्यांचे संगोपन, कामाची आणि विचार करण्याची, बोलण्या-वागण्याची आणि व्यक्त होण्याची पद्धत एकमेकांपेक्षा वेगळी आहे.
तिला समजून घ्यायचे असेल तर, आपला झालेला मेमरी लॉस पुन्हा री-स्टोअर करावा लागेल. आपण कुठुन आलो आहोत हे आठवावं लागेल. उल्कापातापूर्वी आपण कसे होतो, हे लक्षात घ्यावे लागेल. मंगळ गृहावरच्या वातावरणाची कल्पना करावी लागेल. त्यांच्या दिनचर्येची जाणीव करून घ्यावी लागेल. त्यांचे हावभाव जाऊन घ्यावे लागतील. स्त्रियांना भावना व्यक्त करायला आवडतात, मनातलं बोलून दाखवायला संकोच करत नाही. त्यांचे निर्णय भावनांवर आधारित असतात, फारसा तर्क न लावता, आपल्या मनाचे ऐकून निर्णय घेतात. स्वतःवर प्रेम करणाऱ्या असतात.
सजायला आवडतं, मुक्त वातावरणात रमायला आवडतं. संगीत, नृत्य, कला, अभिनय यात विशेष रस असतो. फुलं, झाडी, पक्षी, प्राणी तसेच निसर्गाच्या विलक्षण प्रेमात असतात. रंग, छटा, पॅटर्न, डिजाईन, आकार, आविष्कार, कलाकृती, पाककला या शब्दांचा अर्थ समजणे आणि त्याचा वापर जीवनात योग्य प्रकारे कसा करावा, हे स्त्रियांकडून शिकावे. म्हणून तर विविध प्रकारच्या सजावटी करण्यात त्या माहीर असतात. मंगळावरून शुक्रावर आणि तिथून पृथ्वीवर येण्याची कल्पना आणि धाडस फक्त स्त्रीच करू शकते. लिहावे तितके कमी पडावे, म्हणूनच तर बहुआयामी अशा या दैवी निर्मितीला, आज जागतिक महिला दिनी, मनाचा मुजरा…!

One thought on ““ती” ला समजून घ्या…

  1. लेख अतिशय सुंदर व उपयुक्त आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *