नाशिक : प्रतिनिधी
राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार काल राज्यातील काही भागात बैमोसमी पावसाने हजेरी लावली . नाशिक शहरातही गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते .तर जिल्याचा ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. बेमोसमी पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात काढणी केलेला कांदाही पूर्णपणे पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांद्यावर अवलंबून असणार्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वार्यामुळे शेतकर्यांचे पत्र्याची शेड, तसेच काही ठिकाणी वृक्ष व विजेचे खांबही कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. हवामान विभागातर्फे आणखी दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.तर शहरात येत्या काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे .