नाशिकरोड परिसरात टोळक्याचा दहशत माजविण्यासाठी हवेत गोळीबार

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकरोड परिसरात एका टोळक्याने दहशत माजविण्यासाठी थेट हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात वाढत्या अवैध शस्त्रांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी सुयोग खंडेराव गुंजाळ, ३२, रा. माणिकमोती सोसायटी, मॉडेल कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित नितीन राजेंद्र बर्वे, संतोष पिल्ले, भागवत आणि एक अनोळखी युवक यांनी रविवार दि. २२ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादावरून संशयित संतोष पिल्ले याने आपल्या जवळील बंदुकीमधून फायर केला. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. यातील संशयित नितिन राजेंद्र बर्वे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या कडून गावठी कट्टा जप्त केला आहे. तसेच, गोळीबार प्रकरणातील इतर फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली आहे.

फिर्यादी सुयोग गुंजाळ आणि संशयित नितीन बर्वे मध्ये वाद झाले होते. त्यानंतर या संशयितांनी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेलरोड येथील मॉडेल कॉलनी शिवशक्ती जलकुंभ येथील गार्डन परिसरात संशयित संतोध पिल्ले याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून मद्यधुंद अवस्थेत हवेत गोळीबार केला. यावेळी फिर्यादी गुंजाळ याच्या मित्राने या घटनेची माहिती गुंजाळ याला देत घटनास्थळी येण्यास मज्जाव केला. त्यानंतर गुंजाळ याने दोन दिवसांनंतर पोलिसांना गोळीबाराची माहिती दिली आणि घटनेला वाचा फुटली.

हत्यारे येतात तरी कुठून?
अवैध गावठी कट्टे आणि तीक्ष्ण हत्यारांचा प्रश्न पुन्हा यानिमित्ताने उभा राहिला आहे. शहरात सर्रास अवैद्य हत्यारांचा वापर केला जात आहे. ज्यामध्ये गावठी कट्टा, तलवार, कोयते, चॉपर हे शस्त्र खुलेआम बाळगले जातात आणि त्याचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी सर्रास वापरले जातात. असे असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *