त्र्यंबकेश्वर:प्रतिनिधी
शहरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून मर्कटलीलांनी त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी , गंगाद्वार येथे मोठ्या प्रमाणात वानरांनी उच्छाद मांडला आहे . सात – आठ अशा संख्येने असलेल्या माकडांनी शहरात उच्छाद मांडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . ब्रह्मगिरी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड झाली आहे . जमीन सपाटीकरणाच्या नावाने झालेली तोडफोडमुळे माकडांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला आहे . खाण्याचे आणि पाण्याचे वांधे झाल्याने माकडांनी शहराकडे मोर्चा वळवला आहे . दिवसभर घरांच्या छपरावरून तसेच बाल्कनीमधून उड्या मारत शहराच्या या टोकाच्या त्या टोकाला फिरत असतात . उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थ , महिला वाळवणाचे पदार्थ करत आहेत . माकडांची टोळी आल्यास वडे , पापड या वाळवणाच्या पदार्थांवर ताव मारतात . महिलांची हे पदार्थ उचलण्यासाठी धावपळ होत असते . काही घरांच्या गच्चीत असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील माकडांनी लक्ष्य केल्या आहेत . त्यांचे झाकण काढून आत ठोकणे अथवा सरळ व्हॉल्व्ह सोडून देतात . त्यामुळे परिसरात पाणीच पाणी होत असते . पुरोहितांच्या घरात शिरून पूजासाहित्याची नासधूस केली जात आहे . कुशावर्तावर देखील मांडलेली पूजा विस्कटून टाकण्याचे प्रकार घडत आहेत . शहरातील केवल प्रसारण विस्कळीत झाले आहे . केबलला लटकत कसरती करत असल्याने असे प्रसंग ओढावत आहेत . केबलचालक देखील दुरुस्ती करून वैतागले आहेत . काही भाविकांना चावा घेतल्याचे तसेच जवळचे खाद्यपदार्थ हिसकावून घेतल्याच्या घटना वारंवार घडत आहेत . याबाबत वनखात्यास वेळोवेळी कळविले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत .
नागरिकांनी माहिती देताच रेस्कू टीम पाठविण्यात येते . मात्र , माकडांनी तोपर्यंत आपली जागा बदललेली असते . त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचण येत आहे
. -राजेश पवार , वनपरिक्षेत्र अधिकारी , त्र्यंबकेश्वर