राणेनगरमध्ये झाडांची कत्तल, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

सिडको : विशेष प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 31 मधील राणेनगर परिसरात हॉटेल सेवन हेवनलगतच्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले असून, त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न राबवल्याने नागरिक व मुक्या जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

खोदकामाच्या आड येणारी झाडे विनापरवानगी कापल्याचा आरोप स्थानिकांनी बांधकाम व्यावसायिकावर केला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी झाडांची कत्तल केल्याचा आरोप करत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संगोपन केलेली झाडे अचानक तोडल्याने नागरिक आक्रमक झाले असून, ठेकेदार व बिल्डरवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या ठिकाणी खोदलेले खड्डे भरले न गेल्याने त्यात पाणी साचले असून, डासांचे प्रादुर्भाव व साथरोगांचा धोका वाढत आहे. रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, दोषींवर दंडात्मक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या ठिकाणी आणखी चार ते पाच झाडांची कत्तल होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

शनिवारी वृक्षतोड सुरू असताना आम्ही तत्काळ त्या ठिकाणी जाऊन साहित्य जप्त केले आहे. पंचनामा करण्यात आले असून, बिल्डरवर गुन्हा दाखल केला जाईल व दंडात्मक कारवाई केली जाईल.
– प्रशांत परब, उद्यान निरीक्षक, सिडको विभागीय कार्यालय

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *