सिन्नर-नाशिक सेवा ठप्प; संशयितांवर कारवाईची मागणी
सिन्नर ः प्रतिनिधी
नाशिक महापालिकेकडून सुरू असलेल्या सिन्नर-नाशिक सिटीलिंक बससेवेच्या एका बसचालकास शुक्रवारी (दि.22) रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने मारहाण केल्यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी, सिन्नर मार्गावर सेवा देण्यास चालक, वाहकांनी नकार दिल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक-सिन्नर मार्गावरील सिटीलिंकची बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून दर 15 मिनिटाला बससेवा पुरवली जाते. विशेष म्हणजे, छोट्या-मोठ्या स्टॉपवर बस थांबत असल्याने व थेट सिन्नर न्यायालयापर्यंत सेवा मिळत असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. असे असताना शुक्रवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने सिटीलिंक बसचालकास मारहाण केली. यासंदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, संबंधितावर कारवाई न झाल्याने तसेच कर्मचार्यांना मारहाणीच्या घटना नित्याच्याच झाल्यामुळे या मार्गावर काम करण्यास सिटीलिंकच्या कर्मचार्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे सिटीलिंकच्या व्यवस्थापनाचीही अडचण झाली आहे. दिवसभरात नाशिकहून सिन्नरसाठी 14 बसेस सोडल्या जातात. एका गाडीच्या 4 फेर्या याप्रमाणे दिवसभरात 56 फेर्या होतात. त्यामुळे प्रवाशांना सहजगत्या या मार्गावर प्रवास करता येतो. मात्र, दोन दिवसांपासून सेवा ठप्प असल्याने सिन्नरच्या प्रवाशांमध्ये अस्वस्थता
पसरली आहे.
सिन्नर मार्गावरील सिटीलिंकच्या कर्मचार्यांना मारहाण करण्याच्या गेल्या वर्षभरात चार-पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी पुरते धास्तावले आहेत. यासंदर्भात सिन्नरकर सहकार्य करत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कर्मचार्यांशी चर्चा करून बससेवा सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ.
-मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंकएकीकडे सिन्नर आगाराकडून नाशिक मार्गावर सेवा कमी आहे. दुसरीकडे सिटीलिंकची बससेवा बंद असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांनी तातडीने लक्ष घालून सिन्नरकरांची गैरसोय दूर करावी.
– सुभाष जाजू