कातकरी आदिवासींची हालअपेष्टा
शहापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायत शिरोळ येथील उंबर माळी गावात आजही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. देशाला
स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली असली, तरी या गावातील कातकरी आदिवासी समाजाला मरणानंतरदेखील सन्मानाने अंत्यसंस्कार करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती अतिशय वेदनादायी आहे.
गावात स्मशानभूमीच नाही. त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी ठराविक जागा उपलब्ध नाही. कुठेही मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. मृत व्यक्तीचे नाव मुकुंद लक्ष्मण वाघ (वय 76, उंबरमाळी) यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले.
एवढेच नव्हे, तर जेथे जाळण्याची सोय आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मृतदेह खांद्यावरून उचलून नेण्याची वेळ येते. पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी गंभीर होते. चिखलातून, ओढे-नाल्यांमधून मृतदेह नेणे म्हणजे कुटुंबीयांच्या
दुःखात भरच पडते.
आजही कातकरी समाज हा अत्यंत मागासलेला असून, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा या मूलभूत गरजांपासून ते वंचित आहेत. शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ या समाजापर्यंत पोहोचत नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर विकासाच्या अनेक घोषणा झाल्या, परंतु उंबर माळीतील वास्तव त्याच्या अगदी उलट आहे. मृत व्यक्तीसाठी अंतिम संस्काराची सोय आणि त्यासाठी रस्त्याची सुविधा हा मनुष्यधर्माचा प्रश्न आहे. शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या गावाला स्मशानभूमी व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. उंबर माळीतील परिस्थिती पाहता अजून किती वर्षे आदिवासी समाजाला मूलभूत हक्कांसाठी झगडावे लागणार? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.