एसटी कर्मचार्‍यांना गणेशोत्सवापूर्वीच पगार

नाशिक : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या इतर कर्मचार्‍याप्रमाणे एसटीच्या सुमारे 83 हजार कर्मचारी व अधिकार्‍यांचे ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचार्‍यांचा पगार हा महिन्याच्या 7 तारखेपासून 10 तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटीची प्रतिपुर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांच्या बँक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 477.25 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचार्‍यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला असून, गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्या 26 ऑगस्ट रोजी कर्मचार्‍यांचा पगार खात्यात जमा होईल.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचार्‍यांचे पगार उद्या होणार असल्याचे जाहीर केलं आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात 26 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *