निफाडमध्ये सर्वाधिक 18 आत्महत्या; अवकाळी, कर्जबाजारीचा परिणाम
नाशिक : अश्विनी पांडे
नाशिक जिल्हा हा शेतीच्या दृष्टीने विकसित जिल्हा राज्यात मानण्यात येतो. जिल्ह्यात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकरी समृद्ध मानण्यात येतात. मात्र, याच नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांत 72 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. सर्वाधिक 29 आत्महत्या सन 2020 मध्ये झाल्या आहेत. 2021 मध्ये 16 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
नाशिक जिल्हा कांदा व द्राक्ष उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्ष, टोमॅटो, फुले, पालेभाज्या निर्यातीत नाशिक राज्यात आघाडीवर आहेत. तांदळासह कडधान्याचेही मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यात उत्पादन घेण्यात येते. मात्र, गेल्या सहा वर्षांत वातावणातील बदल आणि शासनाचे बदलते धोरणे यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्यांची सर्वाधिक प्रकरणे मराठवाडा, विदर्भात उघडकीस येत असताना नाशिक जिल्ह्यातही आता शेतकरी आत्महत्येची प्रकरणे उघडकीस येत आहेत. शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे आल्यानंतर त्याची छाननी करत प्रशासनाकडून ते पात्र ठरवल्यानंतर शेतकर्यांना अर्थसहाय्य देण्यात येते.
निफाडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
गेल्या सहा वर्षांत निफाड तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. निफाड तालुक्यात 18 शेतकर्यांनी सहा वर्षांत आत्महत्या केल्या. त्याखालोखाल बागलाण तालुक्यात 15, मालेगाव 11, दिंडोरी 7 सिन्नर व चांदवड येथे प्रत्येकी पाच, त्र्यंबकेश्वर, नाशिक व येवला तालुक्यात प्रत्येकी दोन, तर पेठ, कळवण, नांदगाव, सुरगाणा व देवळा तालुक्यात प्रत्येकी एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे.
शासनाकडून एक लाखाचे अर्थसहाय्य
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंंबांना शासनाकडून आत्महत्येचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर एक लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. एक लाख रुपये हे संबंधित तहसील कार्यालयामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंंबीयांना वितरित करण्यात येतात. एक लाखापैकी पोस्टातील खात्यावर 70 हजार रुपये एफडी स्वरूपात, तर 30 हजार रुपये रोख स्वरूपात वितरित करण्यात येतात.
वर्ष शेतकरी आत्महत्या
2020 29
2021 16
2022 07
2023 10
2024 06
2025 04