निसाकासाठी खा. संजय राऊत यांचे शहा यांना साकडे

निसाका बचावासाठी निफाडला आज मोर्चा

नाशिक : प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील निसाकाचा गळीत हंगाम 2014 पासून बंद आहे. निसाकात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून कामगारांचीही देणी थकली आहे. त्यामुळे या कारखान्याच्या विक्रीचा घातलेला घाट रद्द करून निसाका सुरू करावा, अशी मागणी करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र लिहईत साकडे घातले आहे.
मागील आठवड्यात नाशिक येथे निफाड सहकारी साखर कारखान्यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्यासह निसाका कामगारांच्या मुलांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्याची दखल घेत खासदार संजय राऊत यांनी निसाकाबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमितजी शहा यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरून चर्चा केली व पत्रव्यवहार केला. मुंबईत सोमवारी पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी निसाकाबाबत सभासद व कामगारांच्या व्यथा मांडत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निसाकाबाबत साकडे घातले आहे. आज मंगळवारी (दि. 26) निफाड येथील जळगाव फाट्याहून तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर अनिल कदम यांच्या उपस्थितीत कामगार व संघर्ष समितीचा सकाळी 11 वाजता मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी सभासद व कामगारांनी सकाळी 11 वाजता जळगाव फाट्यावरील यशोरंग मंगल कार्यालयाजवळ जमावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री शहा यांना दिलेल्या पत्रात खा. राऊत यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्हा बँकेने 25 वर्ष भाडेकराराने बी. टी. कडलग कंपनीला देऊनही अद्याप निसाका सुरू केलेला नाही. उलट निसाकाचे 30 कोटींपेक्षा अधिक किमतीचे भंगार परस्पर विक्री करून अपहार केला आहे. कारखान्यातील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक अनागोंदी व भ्रष्टाचारामुळे निसाका कामगारांची देणीही प्रलंबित असताना जिल्हा बँकेने निसाका विक्रीचा घाट घातला आहे. आपण स्वतः लक्ष घालून चौकशी करून निसाका कार्यान्वित करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *