विनापरवाना कीटकनाशकासह खतांची विक्री

तिघांवर कारवाई; ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; एकजण ताब्यात

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात विनापरवाना व अवैध कीटकनाशकांची विक्री करणारी टोळी सक्रिय असून, छुप्या पद्धतीने ते शेतकर्‍यांना विविध आमिष दाखवून त्यांची विक्री करतात. दरम्यान, जिल्ह्याच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि.26) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ओझर येथील खंडेराव मंदिर येथे अवैध कीटकनाशक व जैव उत्तेजक (खते) विक्रीसाठी आले असता, त्यावर भरारी पथकाने झडप घालत ताब्यात घेतले. गोविंद भामरेे, वैभव यादवराव सोनवणे व कुलकर्णी (रा. पुणे) असे संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी भामरे या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयिताकडून एक लाख 69 हजार 904 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. जगन सूर्यवंशी, कृषी अधिकारी गुणनियंत्रण राहुल धनगर (निफाड) यांनी भरारी पथकाच्या मदतीने ही कारवाई केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक (खते) जिल्ह्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली. त्यानुसार ट्रूबडी कन्सल्टिंगचे सहाय्यक व्यवस्थापक सतीश पिसाळ यांनी बनावट ग्राहक बनून कीटकनाशके व जैव उत्तेजकाची संशयित गोविंद भामरे याच्याकडे भ्रमणध्वनीवरून मागणी केली. त्यानुसार संशयित भामरे हा ओझर येथील खंडेराव मंदिर येथे आला असता, दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक डॉ. सूर्यवंशी यांनी भामरेकडे बिलाची व परवान्याची मागणी केली असता, त्याने कुठल्याही प्रकारचे बिल व परवाना सादर केला नाही. त्यामुळे त्याच्याकडील कीटकनाशकासह जैव उतेजक खताबाबत संशय बळावला. संशयिताला त्याच्याकडील साहित्यासह ओझर पोलीस ठाणे येथे घेऊन मालाची पंचांसमक्ष शहानिशा केली. पंच म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी अमोल सोमवंशी, तालुका कृषी अधिकारी योगेश निरभवणे, ट्रूबडी कन्सल्टिंग प्रा.लि. दिल्ली सहाय्यक व्यवस्थापक सतीश पिसाळ यांनी काम केले.

कीटकनाशके तपासणीसाठी ठाण्याच्या प्रयोगशाळेत जमा

बायर क्रॉप सायन्सचे लुना व नेटिवो, तर सिजेंटा कंपनीचे स्कोर हे बुरशीनाशक. सिजेंटा कंपनीचे इसाबिऑन व पेन्शिबाओ वांग प्रा. लि.चे बायो ही जैव उत्तेजके आढळली. कीटकनाशक व बायोस्टिमुलंट पोलीस स्टेशनमध्ये जमा करून त्यातून कीटकनाशके कायदा व नियमामध्ये विहित केलेल्या तरतुदीनुसार कीटकनाशकाचे नमुने काढण्यात आले. कीटकनाशक, बुरशीनाशकाची नमुना चाचणी करण्यासाठी ते ठाण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उर्वरित बुरशीनाशकांचा व बायोस्टिमुलंटचा साठा जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येते की, अधिकृत विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके, खते घेऊन त्याचे पक्के बिल घेऊन ठेवावे. कुठेही काही गैरप्रकार आढळल्यास त्याबाबत कृषी विभागाला माहिती द्यावी.
– रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक ़कृषी अधिकारी, नाशिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *