मराठा आंदोलक आज मुंबईत

आझाद मैदानावर उपोषण; जरांगेंशी सरकार करणार चर्चा

मुंबई :
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक आज मुंबईत धडकणार असून, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. काल शिवनेरी येथे मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा आवाहन केले. ओबीसीतून आरक्षण देण्याची हीच संधी असून, ती फडणवीस यांनी गमवू नये. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ दिली. पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ मान्यही केली. मात्र मनोज जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली 8 तासांची वेळ पाळणार की वेळेवर आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अटीशर्ती काढा अशी मागणी मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
रायगड, शिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत, असं मनोज जरांगे म्हणाले. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या…, त्यानंतर एका दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे.

हृदयविकाराने एकाचा मृत्यू
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव असून, मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नियमांत आंदोलन व्हावे, आम्हाला अडचण नाही : मुख्यमंत्री

मराठा आंदोलनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. कुणाचेही आरक्षण काढून घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले ते न्यायालयातदेखील टिकले. कुणाचेही आरक्षण काढून घेतले जाणार नाही, असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी. लोकशाही मार्गाने आंदोलन करावे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजासाठी योजना आमच्या सरकारच्या काळात सुरु झाल्या. सारथीची स्थापना आमच्या सरकारने केली. पण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना प्रलंबित का होती? तेव्हा राज्यात कोणाची सत्ता होती. मराठा समाजासाठी सर्वात जास्त योजना आमच्या सरकारने लागू केल्या आहेत असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.माझी दोन्ही समाजाला विनंती आहे, दोन्ही समाजासाठी शासन काम करेल. ओबीसी समाजाने लक्षात ठेवावं आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले, इतर कुणीही प्रश्न सोडवले नाहीत. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं आहे, कोर्टात टीकलेलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. लोकशाहीत सगळ्यांना आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही पध्दतीने जेवढी आंदोलन होतील त्याला आम्ही सामोरे जाऊ. कुठलेही आंदोलन होवो, लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये, उच्च न्यायालयाने काही नियम निकष तयार केले आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. तसेच लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. नियमांत आंदोलन होत असेल तर आम्हाला कोणतीही अडचण नाही असं देखील माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

जरांगेंशी चर्चेला तयार : राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांतपणे ते आंदोलन करतायेत याचे कौतुकच आहे. त्यांच्या मागण्या ते सार्थपणे मांडत आहेत. उदय सामंत यांच्याशी काल बोलणे झाले होते, उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा होणार आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार आहोत. समितीशी बोलून याबाबत वेळ ठरवता येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *