देवळालीजवळ सरावादरम्यान हँग ग्लायडर घरावर कोसळले

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
नाशिक आर्मी अ‍ॅडव्हेंचर विंगच्या एका जवानाकडून साहसी क्रीडाप्रकारांतर्गत येणार्‍या हँग ग्लायडरद्वारे गुरुवारी (दि.28) सकाळी नियमितपणे सराव केला जात असताना, तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने जवानाचे ग्लायडरवरील नियंत्रण सुटले अन् ते ग्लायडर थेट देवळाली कॅम्पजवळील शिंगवे बहुला गावातील लोकवस्तीमधील एका रहिवाशाच्या घरावर कोसळले.
या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ग्लायडिंग करणारे हवालदार गुरुदेव सिंग हे गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर देवळाली कॅम्पच्या सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भागात लष्करी जवानांकडून वेगवेगळ्या प्रकारचा सैनिकी प्रशिक्षणांतर्गत सराव केला जात असतो. खंडोबा टेकडी डोंगराच्या पुढे देवळाली फिल्ड फायरिंग रेंजकडे जाणार्‍या रस्त्यावर शिंगवे बहुला हे टोकाला वसलेले शेवटचे गाव आहे. सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास या भागात लष्कराच्या एका जवानाकडून साहसी क्रीडाप्रकारांतर्गत मोटार हँग ग्लायडरद्वारे सराव केला जात होता. यावेळी अचानकपणे त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि जवानाचे ग्लायडरवरील नियंत्रण सुटले. गावातील कौसाबाई चव्हाण या रहिवासी महिलेच्या घरावर हे ग्लायडर कोसळले. दुर्घटनेची माहिती वॉकीटॉकीद्वारे जवानाकडून मिळताच सैनिकांचे ‘विंड रायडर्स’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या पत्र्यावर चढून काही जवानांनी ग्लायडरमध्ये अडकलेल्या जवानाला ‘रेस्क्यू’ केले आणि तातडीने लष्कराच्या वाहनातून रुग्णालयात हलविले असून, पुढील उपचारासाठी भारतीय नौदलाच्या मुंबईस्थित आयएनएचएस अश्विनी रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *