चेहडी येथील तलाठी एक हजाराची लाच घेताना जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना चेहडी येथील तलाठी गौरव शंकर दवंगे वय 31 यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांच्या बहिणीच्या मालकीचे मौजे चेहडी बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 4 हा प्लॉट बक्षीस पत्र म्हणून मिळाला असल्याने या प्लॉट ची बक्षीस पत्रक म्हणून सात बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी दवनगे यांनी एक हजार रुपये लाच मागितली होती. लाचेची ही रक्कम चेहडी येथील तलाठी कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत विभागाचे अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुवर्णा हंडोरे, हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक विलास निकम यांनी ही कारवाई केली.