कळवण : प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील नांदुरी-अभोणा मार्गावरील चिंचबारी परिसरात आज सकाळी अकराच्या सुमारास एक गंभीर अपघाताची घटना घडली. कनाशी येथील सुखकर्ता हॉस्पिटलचे डॉ. किशोर देसले हे नाशिकहून आपल्या क्लिनिककडे परत येत असताना मोहनदरी फाट्याजवळील तीव्र उताराच्या वळणावर त्यांची सुझुकी ब्रिझा कार (क्र. 41/ 4167) रस्त्याच्या कडेला घसरून थेट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला.
समोरून येणार्या अवजड वाहनांचा अंदाज न आल्याने व रस्त्याच्या कडेचा तोल गेला असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते. मात्र नशिब बलवत्तर ठरल्याने डॉक्टर देसले हे या भीषण अपघातातून सुखरूप बचावले असून त्यांना फक्त किरकोळ खरचटल्याच्या जखमा झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच अभोणा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीदेखील मदतकार्य करून डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढले. चिंचबारी परिसरातील हा रस्ता अतिशय धोकादायक असून यापूर्वीही अनेक अपघात येथे घडले आहेत. या घटनेमुळे रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.