सोयाबीन शेतातून घरी येताच दर कोसळले

उत्पादन घटूनही हमीभावापेक्षा कमी दर, शेतकर्‍यांमध्ये संताप

निफाड : विशेष प्रतिनिधी
राज्यात झालेल्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी बाजारपेठेत उत्पादन केलेल्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वारंवार अडचणीत येत आहेत. सध्या सर्वत्र सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतातून सोयाबीन काढून घरादारात येत नाही, तोच बाजारात सोयाबीन भाव कोसळले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फिरले आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यंदा खरिपाच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरिपाची पेरणी वेळेत झाली. मात्र, सध्या सोयाबीन काढण्यासाठी चार हजार रुपये एकरी मजुरी देऊनदेखील मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. सोयाबीन काढण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच दमछाक होत आहे.
सद्यःस्थितीत बाजारात सोयाबीनला फक्त 3000 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शेतकर्‍यांचा उत्पादनखर्चही या दरात भरून निघत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसत आहे. पुढील रब्बी हंगामासाठी तयारी करण्यासाठीही हातात काही उरत नाही. सोयाबीन उत्पादनात घट आणि दरात घसरण या दहेरी संकटामळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी शेती उत्पादनासाठी विविध बँका, पतसंस्था, सोसायट्यांकडून आधीच कर्ज घेतले असून, ते
फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. एका बाजूला काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असले तरी, नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांत उत्पादन झाले आहे, तेथे काढणी करून बाजारपेठेत माल आणला जात असल्याने दरात घसरण सुरू आहे. सोयाबीनच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकर्‍यांचा लागवडीचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.

यंदाही शेतकरी अडचणीतच

अनेक शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींमुळे व साठवणुकीची सोय नसल्याने पिकाची साठवणूक करता येत नाही, सोयाबीनची विक्री तातडीने करावी लागते. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात माल येतो आणि दरांवर परिणाम होतो. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना यंदाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *