स्वच्छता मोहिमेत शिक्षणमंत्र्यांचा सहभाग

मालेगाव शहरात ‘स्वच्छता ही सेवा’ विशेष मोहिमेचा शुभारंभ

मालेगाव : प्रतिनिधी
‘स्वच्छ भारत अभियान’च्या धर्तीवर संपूर्ण राज्यभर सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेचा उद्देश फक्त परिसर स्वच्छ ठेवण्यापुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या मनामनांत स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शहरातील कॉलेज मैदान परिसरात प्रत्यक्ष सहभागी होत स्वच्छता केली. त्यांनी स्वतः मैदान स्वच्छ करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश दिला. कचरा संकलन, विलगीकरण आणि योग्य व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांना आपले शहर, आपली जबाबदारी या संकल्पनेची जाणीव करून दिली. ही मोहीम मालेगाव महानगरपालिका, शिवसेना स्थानिक पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, तसेच अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात येत आहे. दिवाळीपूर्वी पाच दिवस चालणार्‍या या विशेष मोहिमेंतर्गत मालेगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ नंतर देशात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती झाली. त्याच प्रेरणेतून ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम महाराष्ट्रात एक सामाजिक चळवळ म्हणून आकार घेत आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 11 मधील मोतीबाग नाका ते नवीन वस्ती गल्ली रोड, नानावटी पेट्रोलपंप ते बापूजीनगर सर्व गल्ली रोड, निसर्ग हॉटेल ते महारुद्र हनुमान मंदिर नाकोडा प्रोव्हिजन शिवरोड, बागूल कॉलनी, जे. के. टायर्स ते जैनस्थानक परिसर, महालक्ष्मी सोसायटी, शिवरोड संकल्प हॉस्पिटल सर्व गल्ली रोड, पटेलनगर, पोफळेनगर, बोरसेनगर, विजय कॉलनी सर्व गल्ली रोड, अयोध्यानगर शिवराज कॉलनी, ओमकारनगर सर्व कॉलनी रोड, हनुमाननगर, विकासनगर, मंगलमूर्तीनगर, टेहरे फाटापर्यंत सर्व गल्ली रोड या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव, उपायुक्त (मुख्यालय) गणेश शिंदे, सहायक आयुक्त (स्वच्छता) अनिल पारखे तसेच प्रमुख स्वच्छता निरीक्षक इकबाल जान मोहम्मद, आनंदसिंग पाटील, प्रभाग अधिकारी प्रभाग क्रमांक 1 सचिन भामरे, तसेच शिवसेना नेते अजिंक्य भुसे, शिवसेना महानगरप्रमुख विनोद वाघ, माजी नगरसेवक संजय दुसाने, पिंटू अहिरे, तसेच संत गाडगेबाबा प्रतिष्ठान व नागरिकांनी यात
सहभाग नोंदवला.

48 टन कचरा उचलला

स्वच्छता निरीक्षक, मुकादम व कर्मचार्‍यांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात पाच स्वच्छता निरीक्षक व मुकादम तसेच 380 कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी 3 जेसीबी, 4 टिप्पर, प्रत्येकी 1 ट्रिप, 4 ट्रॅक्टर, प्रत्येकी 1 ट्रिप, 3 घंटागाडी, प्रत्येकी 2 ट्रिप आदी वाहनांद्वारे 48 टन कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे नेण्यात आला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *