आली दिवाळी

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वांत मोठा सण. हिंदूच नव्हे, तर विविध धर्मांचे लोकही हा सण साजरा करतात. दारासमोरील मनमोहक रांगोळी, पणत्यांचा उजेड, आकाशकंदिलांचा प्रकाश, रोषणाई, रंगरंगोटी, तोरण, फटाक्यांची आतषबाजी, अशा वातावरणातील उल्हास आणि उत्साहाने भारलेला दिवाळी सण प्रेम, मैत्री आणि मानवतेचा प्रकाशमय संदेश देणारा आहे. भारतीय लोक आपल्या कुवतीनुसार आपापल्या परीने हा सण साजरा करतात तेव्हा,


आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊनी आली…
या गाण्याच्या ओळी सहज ओठांवर येतात, आठवतात. यंदाही तसेच वातावरण असले, तरी महाराष्ट्रात यंदा दिवाळी ओल्या दुष्काळानंतर आली आहे. निम्म्या महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले. पुराचे पाणी घरादारांत, दुकानांत शिरले. पुराच्या पाण्याने शेतीयोग्य जमीन खरडून वाहून नेली. जीवितहानीही झाली. पशुपक्षी दगावले. नुकसानग्रस्तांना सरकारने मदत जाहीर केली. पंचनामे करून मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा होऊ लागली असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. ओला दुष्काळसदृश परिस्थितीतही दिवाळीच्या आगमनाची उत्सुकता लहानमोठ्यांना आहे. करंजी, लाडू, शंकरपाळे, अनारसे, चकली, शेवपापडी, चिवडा इत्यादी पदार्थ फराळासाठी बनविले जातात. आप्त, मित्रमंडळींंना फराळासाठी बोलावणे, शुभेच्छा देऊन औपचारिकपणे दिवाळी साजरी केली जाते. अंगणात सुबक रांगोळी, मिणमिणत्या पणत्यांची प्रकाशमय रांग. सोबत वर आकाशकंदिलाचा प्रकाश असतो. अत्यंत प्रसन्न वातावरणात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या आधी म्हणजे दसरा झाल्यानंतर घरांची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी केली जाते. अत्यंत प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळी तशी लवकरच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आली असली, तरी हिंदू मराठी वर्षात दिवाळी नियमितपणे तिथीनुसार येत असते. यंदा 17 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीला दीपोत्सव किंवा प्रकाशोत्सव, असेही म्हणतात. वसूबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा-बलिप्रतिपदा, भाऊबीज, हेच दिवाळीचे खरे दिवस आहेत. दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस काही ना काही महत्त्व आहे. या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आहे. यंदा शुक्रवार, दि. 17 ऑक्टोबर ते गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत दिवाळी आहे. शरद ऋतू सुरू होत असल्याने नवे धान्य तयार झालेले असते म्हणून हा कृषिविषयक आनंदोत्सवही आहे. दि. 17 ऑक्टोबर रोजी रमा एकादशी झाल्यानंतर गोवत्स द्वादशी, वसूबारस आहे. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी आश्विन वद्य द्वादशी तिथीला गोवत्स द्वादशी असते. यास वसूबारस असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गायीची पूजा करतात. हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असतो. धनत्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा महत्त्वाचा दिवस असतो. शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी शनिप्रदोष असून, यमदीपदान केले जाणार आहे. याच दिवशी गुरुद्वादशी आहे. आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. सोमवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. याच दिवशी अभ्यंगस्नान असेल. सोमवती अमावस्या योगही जुळून येत आहे. लक्ष्मीपूजन हा सर्वांत महत्त्वाचा दिवस. याच दिवशी खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी केली जाते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली जाते. मंगळवार, दि. 21 ऑक्टोबरला आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन आहे. सायंकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी अमावस्या समाप्त होत आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटे ते रात्रौ 8 वाजून 40 मिनिटे असा आहे. आश्विन अमावास्येला लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते, अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्यांची रोषणाई करतात. घरातील कचरा, घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणार्‍या केरसुणीला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. बुधवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आहे. या दिवशी कार्तिक मासारंभ होणार आहे. या दिवशी गोवर्धन पूजन केले जाते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत वर्ष सुरू होते म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. गुरुवार, दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीज आहे. सौर हेमंत ऋतू सुरू होणार असून, हा दिवस यमद्वितीया म्हणूनही साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. भारताच्या निरनिराळ्या भागांत दिवाळीसंबंधी भिन्न-भिन्न लोकाचार दिसून येतात. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभर तणाव अनुभवल्यानंतर धकाधकीचे दिवस सहन केल्यानंतर दिवाळीनिमित्त येणारी आणि सर्वदूर पसरणारी प्रसन्नता हवीहवीशी वाटते. दिवाळीच्या आगमनाची चाहूल सर्वप्रथम बाजारात जाणवते. ग्राहकांची वाढती लगबग, हवे ते शोधण्याची धांदल आणि मिळाल्यानंतरचे समाधान पैशात मोजता येत नाही, हेच दृश्य सध्या बाजारात दिसत आहे. अर्थात, यंदा दिवाळीची दिवेलागण होण्यापूर्वीच ओल्या दुष्काळाची काजळी पुसली जात आहे. खरे पाहता दिवाळी हा पिके हाती येण्याचा काळ. मशागत केल्यानंतर शेतात पिके डोलताना बघण्याचा हा काळ. मात्र, अवकाळी तसेच अतिवृष्टीने यावेळी शेतकर्‍यांच्या डोळ्याला लागलेल्या धारांमध्ये खारेपणा वाढवण्याचेच काम केले. शेतकरी पुन्हा उभा राहील आणि प्रत्येकाच्या घरापुढे पणत्या त्याच तेजाने लागतील, अशी आशा आहे. शेवटी दिवाळी हे काही एका सणाचे नाव नाही, तर तो आनंदाच्या वाटेने प्रकाशाकडे नेणारा एक प्रदीर्घ प्रवास आहे. दिवाळीनंतर शेतकरी पुन्हा कामाला लागणार आहेत. रब्बी पिकांची पेरणी करण्याच्या तयारीला शेतकरी लागतील. यंदाही बाजारपेठेत दिसणारा उत्साह, खरेदीचा ओघ आणि ग्राहकांच्या बदललेल्या सवयी यामुळे दिवाळीची तयारी, लगबग हेच दाखवून देणारे दिसते आहे. पारंपरिक स्वरूपातून काहीशा आधुनिक ग्राहकांच्या आवडीनुसार लगबग रंगली आहे. शहरे आणि ग्रामीण भागातील खरेदीचा वेग, उत्पादनांची मागणी आणि नव्या ट्रेंड्समध्ये स्पष्ट फरक जाणवतो. यावर्षी दिवाळीत नवीन ट्रेंड्समध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम दिसत आहे. भेटवस्तू, फराळ, फटाके, सजावटीच्या वस्तू, वाहन खरेदी, अशा सर्वच क्षेत्रांत नवकल्पना, पर्यावरणपूरकता, आरोग्यदायी उत्पादनांचा समावेश समाजाची वाढती समज दाखवून देत आहे. ग्राहकांच्या बदललेल्या सवयींना प्रतिसाद देण्यासाठी विक्रेते सतत नवे प्रयोग करत आहेत. जीएसटीचे दर कमी झाल्याने दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचे दर कमी झाले आहेत. याशिवाय दिवाळीनिमित्त लागणार्‍या सर्व वस्तूंचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे खरेदीचा उत्साह आणखी वाढला आहे.


आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊनी आली…
हीच तर खरी दिवाळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *