2100 कोटींचा खर्च; जमीन संपादनासाठी सुनावणी
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममधील 283 एकर जमिनीच्या संपादनासाठी मनपातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि.20) प्रशासनाने तेरा सामाजिक संस्थांची सुनावणी घेत त्यांच्याशी वाटाघाटीबाबत चर्चा केली. तर पुढच्या आठवड्यात शेतकर्यांना सुनावणीसाठी बोलावले जाणार आहे. दरम्यान, साधुग्राममधील एकूण 377 एकरपैकी मनपानेे 94 एकर जागेचे संपादन केले असून, उर्वरित 283 एकरवर घोडे अडले आहे. या जागेचाच तिढा सोडवण्यासाठी 2100 कोटींचा खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव मनपाने शासनाला सादर केल्याचे मनपातील सूत्रांनी
म्हटले आहे.
महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात गुरुवारी साधुग्रामबाधितांची सुनावणी वाटाघाटी समितीकडून घेण्यात आली. दोन वर्षांनी शहरात होणार्या सिंहस्थ कुंभमेळा बाराशे एकरवर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर सभेतून सांगितले होते. परंतु, महापालिका प्रशासनाला अद्याप साधुग्राममधील जागेचे संपादन करता आलेले नाही. उर्वरित जागेचा तिढा कसा सोडवला जाणार, असा सवाल केला जातो आहे.
मात्र, आता पालिकेने साधुग्रामचा विषय सोडवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. 283 एकर ज्या व्यक्ती, संस्थांच्या नावावर आहेत, त्यांची टप्प्याटप्प्याने सुनावणी घेतली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. एकूण तेरा सामाजिक संस्थांनी हजेरी लावली असता, त्यांच्याशी वाटाघाटी समितीच्या सदस्यांनी संवाद साधत पालिका कुठपर्यंत मोबदला देऊ शकते, याबाबतची कल्पना दिली.
13 संस्थांकडे 60 एकर क्षेत्र
साधुग्राममधील 377 एकरपैकी 60 एकर क्षेत्र गुरुवारी बोलावलेल्या सामाजिक संस्थांकडे आहे. तर उर्वरित 223 एकर जमिनीसाठी शेतकर्यांची सुनावणी घेतली जाणार आहे.
वाटाघाटी समितीमधील सदस्य
अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली वाटाघाटी समितीची स्थापना केली असून, विशेष म्हणजे, या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर समितीत नगररचनेचे उपसंचालक, सहायक संचालक, मुख्य लेखा वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, विधी विभागप्रमुख, शहर अभियंता, अधीक्षक अभियंता हे या समितीमधील सदस्य आहेत.