तीर्थयात्रेतील लुटारू

नुकताच एक रील पाहण्यात आला, ज्यात सोलापूर-अक्कलकोट मार्गावर चालणार्‍या भावनिक लुटीवर रील बनवणार्‍या महिलेने प्रकाश टाकून लोकांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. या रीलमध्ये त्या महिलेने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे, की ती या मार्गावरून कारने जात असताना एक युवक पाण्याची रिकामी बाटली दाखवत गाडी थांबवण्याची विनंती करताना दिसला. त्यांना पाणी हवे असेल म्हणून महिलेने गाडी थांबवून आपल्याजवळ असलेल्या पाण्याच्या कॅनमधून सदर तरुणाला पाण्याची बाटली भरून दिली. बाटली भरून देत असताना त्या तरुणाने आम्ही शेगाव येथून आलो असून, अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला चाललो आहोत, असे सांगितले. त्या तरुणासोबत त्याची पत्नी भासणारी तरुणीसुद्धा होती. अशी अनेक जोडपी त्यांच्यासोबत मागोमाग चालत होती. त्यांच्या हातात भगवे ध्वज होते. आमच्यासोबत आणखीही बरेच जण असून, त्यांनी सर्वांच्या जेवणासाठी पैशाची मागणी केली. या महिलेने स्वतःजवळील दोनशे रुपये दिल्यानंतर तेवढे पैसे पुरणार नसल्याचे तरुणाने सांगितले. आपल्याकडे तेवढेच पैसे असल्याचे सांगत महिला आपल्या गाडीने तिथून निघून गेली. रस्त्यात भेटलेली मंडळी खरंच स्वामींच्या दर्शनासाठी जात आहेत की लोकांची भावनिक लूट करत आहेत याविषयी शंका आल्याने महिलेने पुढे जाऊन यू-टर्न घेऊन गाडी पुन्हा त्याच मार्गाने नेली, तेव्हा ज्याने आधी पाण्याची रिकामी बाटली दाखवत गाडी थांबवली तोच तरुण पाण्याची रिकामी बाटली दाखवत गाडी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यांच्या जवळ जाताच आपली चोरी पकडली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ते जोडपे तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागले.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक जण कुटुंबासह सहलीला व देवस्थानांना दर्शनासाठी निघतात. प्रवासात अधिक वेळ जायला नको म्हणून अनेक जण असेल तर
स्वतःची नाही, तर भाड्याने चारचाकी गाड्या बुक करतात. या गाड्यांना टार्गेट करून अशी लुटारू मंडळी दुपारच्या वेळेत स्वतःजवळील पाणी संपल्याचा कांगावा करत गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करतात. एकदा गाडी थांबली की त्यांच्याकडून खाण्यासाठी पैशाची याचना करतात. त्यांच्यासोबत असलेल्या महिला, लहान मुले यांच्याकडे असलेल्या कपड्यांच्या बॅगा, हाती असलेले ध्वज यावरून हे खरेच देवदर्शनासाठी जात असल्याचा भास लोकांना होतो आणि लोक त्यांना खाण्यापिण्यासाठी पैसे देतात. ती गाडी पुढे गेल्यानंतर काही वेळातच ते मागून येणार्‍या गाड्यांना खुणावून पुन्हा त्याच पद्धतीने त्यांच्याकडूनही पैसे उकळतात. देवदर्शनासाठी जाणारी मंडळी भावनेच्या भरात यांना बर्‍यापैकी पैसे देतात आणि पुण्य केल्याचे समाधान पदरी पाडून घेतात, ज्यामध्ये या मंडळींचा आयता लाभ होतो. खरेतर हे पुण्यकर्म नसून या भामट्यांना आणखी भक्तांना लुटण्यासाठी दिलेले प्रोत्साहन असते. त्यामुळे विशेषतः देवस्थानांना चारचाकी गाडीने जाणार्‍या भाविकांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे. देवस्थानांच्या यात्रा जवळ आल्या की अशाच प्रकारची काही मंडळी हाती टाळ आणि भगवे ध्वज घेऊन शहरांत घरोघरी जाऊन यात्रेसाठी पैसे मागताना दिसतात. आपल्याला यात्रेला जाणे शक्य नाही, ही मंडळी चालली आहेत तर निदान यांना तरी आर्थिक सहाय्य करून भगवंतांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी, या भोळ्या भावनेने श्रद्धाळू मंडळींंना पैसे व अन्य सहाय्य करतात. वास्तविक ही मंडळी लोकांकडून पैसे गोळा करून देवस्थानांना जात नाहीत. शहरी भागात मागील काही महिन्यांपासून आणखी एक प्रकार प्रकर्षाने दिसू लागला आहे.
गर्दीच्या ठिकाणी काही महिला देवीची मूर्ती किंवा छायाचित्र ठेवलेले एक ताट किंवा ताम्हण हातात घेऊन पादचार्‍यांना अडवताना दिसतात. ताट येणार्‍या-जाणार्‍या सुशिक्षित लोकांसमोर धरून आम्ही देवीच्या यात्रेला जात असल्याचे सांगून ताटात पैसे टाकण्याची विनवणी करतात. या महिला नीटनेटकी साडी नेसून अंगावर दागिने वगैरे परिधान केलेले असतात. रस्त्याने जाणार्‍या सुशिक्षित पुरुषांना त्या विशेषकरून टार्गेट करतात. त्यांचा नीटनेटकेपणा पाहून पुरुष मंडळी त्यांच्यावर सहज विश्वास टाकून 20-50 किंवा 100 रुपयांची नोट बिनदिक्कतपणे ताटात ठेवतात. देवाधर्माचा आधार घेऊन पूर्वी देवस्थानांच्या ठिकाणी याचक मंडळी एक-दोन रुपये मागत असत. आता मात्र लोकांच्या धार्मिक भावनेचा गैरफायदा घेणारी आधुनिक लुटारू मंडळी सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. लोकांचा देवभोळेपणा यांना दिवसागणिक श्रीमंत बनवत आहे. अशा मंडळींना दान देऊन आपल्याला काहीच लाभ न होता त्यांना मात्र बळ मिळत आहे. वाढत्या वयामुळे गलितगात्र झालेल्यांचे एकवेळ ठीक. मात्र, हातपाय शाबूत असताना भाविकांच्या धार्मिक भावनांचा लाभ घेऊन त्यांना लुटणार्‍या या लुटारूना भगवंत त्यांच्या कर्माचे फळ देईलच. मात्र, अशा लोकांमुळे धर्माबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी भाविकांनी जागृत राहून त्यांना अद्दल घडवायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *