इगतपुरी नगरपरिषद तिजोरीत जमा झाले 28 लाख

निवडणुकीमुळे वसुली विभाग मालामाल

इगतपुरी : प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करून वसुली मोहीम राबवूनही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. मात्र, सार्वत्रिक निवडणुकीमुळे अवघ्या 15 दिवसांत नगरपरिषदेच्या
तिजोरीत 27 लाख 80 हजार 548 रुपयांची भर पडली. त्यामुळे वसुली विभाग मालामाल झाला आहे.
निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवार व त्यांचे सूचक यांनी नगरपरिषदेचा कोणताही कर थकबाकी नसणे आवश्यक आहे, या अटीमुळे इच्छुकांंनी नगरपरिषदेचा थकीत कर तत्काळ भरून पावत्या घेतल्या आहेत. नगरपरिषदेच्या वसुली विभागात कर भरण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अनेकांनी गर्दी करत थकीत रक्कम भरल्याने एकूण घरपट्टी 19 लाख 92 हजार 270 रुपये, तर पाणीपट्टी सात लाख 87 हजार 845 रुपये, अशी 27 लाख 80 हजार 548 रुपये तिजोरीत जमा झाले आहे. यामुळे नगरपरिषदेच्या वसुली विभागाला ’अच्छे दिन’ आले होते. एरवी नगरपरिषदेला थकलेल्या कर वसुलीसाठी आरोग्य विभागाच्या गाड्यांवरून नागरिकांना आवाहन करावे लागते. मात्र, यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांंनी व त्यांनी ज्यांना सूचक केले त्यांनी स्वयंस्फूर्तीने घरपट्टी व पाणीपट्टी कर भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे वसुली विभागाला मोठी चालना मिळाली आहे. वर्षअखेरीस महसूल वाढीचा नवा विक्रम नोंदवला गेल्याचे समजते आहे.

अनामत रक्कम

नगरपरिषदेचे निवडणूक आरक्षण जाहीर होताच अनेक घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांनी आपापल्या प्रभागातील इच्छुकांच्या संपर्कात येऊन ’यंदा तुम्ही नक्की…तुमच्यासाठी आम्ही आहोतच…’असे सांगून अनेक सूचकांनी आपली घरपट्टी व पाणीपट्टी भरून घेतली. निवडणुकीसाठी इच्छुकांंना अनामत रक्कम भरावी लागते. यात नगराध्यक्षपदासाठी एक हजार रुपये, तर नगरसेवक पदासाठी पाचशे रुपये भरावे लागतात. यावेळी निवडणुकीत 118 इच्छुकांनी अनामत रकमेची पावती फाडली आहे. त्यामुळे एकूण 72 हजार 500 रुपये महसुलीची भर तिजोरीत पडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *