संवाद हा मनमोकळा असावा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून गलिच्छ शब्दात टीका करणे चुकीचे आहे , टीकाही वैचारिक असावी असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी मांडले. कुसुमाग्रज स्मारक येथे आयोजित साहित्यिक आणि पत्रकारीता क्षेत्रातील महिलांशी रविवारी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केले. याप्रसंगी व्यासपीठावर हेमंत टकले उपस्थित होते. यासह शहरातील साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर महिला सभागृहात उपस्थित होत्या.
सध्या सुरू असलेले राजकारण हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. अशा प्रकारच्या राजकारणामुळे देशाच्या राजकारणात आपल्या राज्याची प्रतिमा मलीन होते. याची खंत वाटते. सध्या सुरू असलेले राजकारण थांबायला हवे त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सामजस्यांची भूमिका घ्यायला हवी.
सध्या समाजातील वातावरण पाहिल्यावर आजच्या पिढीपेक्षा आधीची पिढी जास्त वैचारिक आणि पुरोगामी विचारांची होती असे वाटते. आपण फक्त कपड्यांनी मॉर्डन होत आहोत मात्र विचार अजूनही प्रतिगामी असल्याचे चित्र आहे. समाज शिक्षणाने समृध्द होईल असे वाटत असताना अधिक शिक्षण घेऊनही समाजातील जातीय, प्रांतिक मतभेद वाढत आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, अशा प्रकारच्या मनमोकळ्या संवादातून समाजातील वास्तववादी प्रश्न समजत असतात. हा या संवादामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. आधीच्या पिढीचे राजकारणी हे साहित्यिक, पत्रकार, कलाकार यांच्याशी संवाद साधत समाजात सुरू असणार्या घडामोडी , त्यांचे प्रश्न जाणून घेत असत. मात्र आजच्या पिढीचे सर्वच राजकारणी अशा प्रकारचा संवाद साधण्यात कमी पडत आहोत. अशी प्राजंळ कबुली त्यांनी दिली. या मनमोकळ्या संवाद प्रसंगी पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील महिलांनी महिलाविषयक प्रश्नांसह समाजातील रोजच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्र्रश्न खा. सुळे यांच्यासमोर मांडले. खा. सुळे यांनीही प्रत्येक प्रश्न टिपून घेत लोकसभेत मांडण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे रजनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक आणि पत्रकारांनी प्रश्न विचारायलाच हवेत
साहित्यिक आणि पत्रकार हे आपल्या लेखणीतून समाजातील वास्तव मांडत असतात. त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण असते. त्यांनी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारायलाच हवेत. राज्यकर्तेही तुमच्या प्रश्नांची समाधाकारक उत्तरे द्यायला बांधिल आहेत. असे खा. सुळे यांनी नमुद केले.
आमचे पारंपरिक मराठी कुटुंब : खा. सुळे
खा. सुळे यांनी औपचारिक संवादात त्यांच्या कुटुंबाविषयी अनेक बाबी उलगडून सांगितल्या. आमचे कुटुंब साधे पारंपरिक मराठी कुटुंब आहे. आई वर्तमान पत्र वाचत नाही अथवा दुरचित्रवाणी पाहत नाही. तिचे म्हणचे असते की तुम्ही कसे आहात,काय करता हे मला माहिती आहे, त्यासाठी वाचण्याची, पाहण्याची गरच नाही. मात्र, आवर्जून सर्व वृत्तपत्रात असलेले शब्द कोडे सोडवते असे त्यांनी सांगितले. तसेच दिल्लीला असल्यावर पवार साहेबांसोबत वृत्तपत्रांचे सकाळी बरोबरच वाचन केले जाते. आणि त्याविषयी आमच्यात चर्चाही होते. असे त्या म्हणाल्या.
वर्तमानपत्रातून कोरोना पसरत नाही.
कोरोना काळात वर्तमान पत्राच्या वापरातून कोरोना होऊ शकतो या कारणाने अनेकांनी वृत्तमान पत्र विकत घेणे टाळत ऑनलाइन माध्यमावर वृत्तपत्र वाचत आहेत. मात्र वृत्तमान पत्रतून कोरोना विषानुचा फैलाव होत नाही हे खा. सुप्रिया सुळे यांनी निक्षून सांगितले.