भारतीय कांद्यामुळे बांगलादेशात भाव घसरले

नवीन कांद्याची आवक; शेतकर्‍यांना मिळणार आर्थिक दिलासा

लासलगाव : वार्ताहर
भारतीय कांद्याच्या आयातीमुळे बांगलादेशातील कांद्याच्या बाजारभावात तत्काळ मोठी घट झाली. दिनाजपूरच्या हिली भूबंदरातून कांद्याची आयात झाल्याच्या बातमीने एकाच दिवसात कांद्याच्या किमती प्रतिकिलो 30 ते 40 टका (बांगलादेशी चलन) कमी झाल्या. बाजारात काहीसा दिलासा मिळत असल्याचे तेथील व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. जर आयात सुरू राहिली, तसेच स्थानिक नवीन कांद्याचा पुरवठा वाढला तर भाव आणखी खाली येतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
काही दिवसांपूर्वी बांगलादेशातील कांद्याचे बाजार अचानक अस्थिर झाले होते. चार ते पाच दिवसांच्या कालावधीत भाव सुमारे 40 टकाने (बांगलादेशी चलन) वाढून 150 टका प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. या अस्थिरतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी बांगलादेश सरकारने सुरुवातीला आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे किमती थोड्या कमी झाल्या; परंतु नंतर सरकारने हा निर्णय मागे घेतल्यावर किंमत पुन्हा वाढली. अखेरीस बाजार नियंत्रित ठेवण्यासाठी बांगलादेश सरकारने गेल्या रविवारपासून मर्यादित आयातीला परवानगी दिली. कृषी मंत्रालयाने दररोज 50 आयात परवाने जारी केले जातील आणि प्रत्येक परवान्यांंतर्गत जास्तीत जास्त 30 टन कांद्याला मंजुरी मिळेल, असे स्पष्ट केले. तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतातून (नाशिक भागातून) कांद्याची आयात पुन्हा सुरू झाली. रविवारी (दि. 7 डिसेंबर) दुपारी साडेचार वाजता कांद्याने भरलेले तीन ट्रक हिली बंदरात दाखल झाले. आयातीच्या वृत्तामुळे ढाक्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये जो कांदा 130 ते 150 टका विकला जात होता, तो आता 100 ते 120 टका दराने विकला गेला. चितगावमधील खातुंगंज येथील घाऊक केंद्रातही 30 ते 40 टका घट झाल्याचे दिसले. व्यापार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात कांद्याचा पुरवठाही पूर्वीच्या तुलनेत वाढला आहे आणि येत्या आठवड्यात आवक पूर्ण वेगाने होईल. त्यानंतर किमती आणखी कमी होतील.

लासलगावला कांदा दरात सुधारणा

भारतातून बांगलादेशात कांदा निर्यात सुरू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. बांगलादेशच्या आयातीमुळे भारतीय बाजारपेठांत विशेषतः आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरांत सुधारणा झाली आहे. बांगलादेशात कांद्याची निर्यात सुरू झाल्यामुळे कांद्याच्या दरवाढीला चालना मिळणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक फायदा होईल.

केंद्राने निर्यातबंदी करू नये

सरकारने जर विविध देशांत कांदा निर्यातीला परवानगी दिली असती तर शेतकर्‍यांना कमी दरात कांदा विकण्याची गरज पडली नसती. केंद्र सरकारने पुढील काळात कांदा निर्यातीला कोणतीही बंदी करू नये. इतर देशांनी जर अशीच भारतातून कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला, तर कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *