किमान तापमान 8.1 तर कमाल तापमान 29.2
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात बुधवारी (दि. 10) हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. बुधवारी नाशिक शहराचे तापमान 8.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले तर कमाल तापमान 29.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. चार दिवसांत तापमान चार अंशांनी घटल्याने शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पहाटे आणि सायंकाळच्यावेळी अधिक गारठा जाणवत आहे. थंडीचा कडाका अचानक वाढल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तापमानातील झपाट्याने घसरण जाणवत असल्याने सर्दी, खोकला, श्वसन त्रास अशा आरोग्य समस्या वाढू लागल्या आहेत. दरम्यान, नाशिक शहरात दरवर्षी सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होत असते. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात तापमान किती अंशांपर्यंत खालावले जाणार, याबाबत नाशिककरांना उत्सुकता आहे. येत्या आठवडाभर थंडीचा जोर कायम असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, थंडी अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात सेन-यार आणि दिट-वाह ही दोन चक्रीवादळे तयार झाली होती. त्यानंतरही राज्यात अपेक्षेपेक्षा जास्त थंडीचा अनुभव आला. आता मात्र 20 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. उत्तर भारतातील थंड वारे ईशान्येकडून थेट महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. दक्षिणेकडील हंगामी मॉन्सूनचा प्रभाव संपल्यामुळे या थंड वार्यांना कोणताही अडथळा राहत नाही. तसेच पश्चिमी क्षोभ सलग येत असल्याने थंड वार्यांचा पुरवठा कायम आहे. याचबरोबर जेट स्ट्रीमचा पट्टा 39 अंशांवरून 22 अंश अक्षवृत्तापर्यंत दक्षिणेकडे सरकल्यामुळे गारठा अधिक
जाणवत आहे.