अग्निशमनच्या ‘त्या’ 36 कर्मचार्‍यांना दिलासा

भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये मानधनावर फायरमन म्हणून 36 कामगार दोन वर्षापासून कार्यरत आहेत. सदरील कामगारांना सेवेमध्ये कायम करावे. याप्रश्नी म्युनिसिपल कर्मचारी सेनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी (दि.10) सुनावणी झाली असता, न्यायालयाने सद्यःस्थित या कर्मचार्‍यांच्या सेवेत कुठलाही बदल करू नये. असे
निर्देश महापालिकेला दिले आहेत.
केंद्र शासनाच्या आदेश 1946 मधील कलम 4 सी नुसार 240 दिवस सेवा पूर्ण झाल्यास त्यास कायम केले जाते. या नियमाचा आधार म्युनिसिपल कर्मचारी सेनेने घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. दरम्यान, हे कर्मचारी दोन वर्षांपासून मनपात कार्यरत असल्याने त्यांची प्रत्येक वर्षी 240 दिवस सेवा पूर्ण झालेली असल्याने म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेमार्फत कर्मचार्‍यांना कायम करण्यासाठी संघटनेने याचिका महाराष्ट्र रिकॅगनायझेशन ऑफ ट्रेड युनियन अँड अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस अ‍ॅक्ट 1971 अंतर्गत तक्रार दाखल केली होती बुधवारी न्यायालयामध्ये संघटनेचे अ‍ॅड जी. एस. तेलंगरे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करून न्यायालयाने सर्व परिस्थिती ऐकून कामगारांच्या सेवेत कुठलाही बदल करू नये यास पुढील आदेशापर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

अग्निशमनमधील 36 कर्मचार्‍यांना कायम करावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने महापालिकेला निर्देश देत सदर कर्मचार्‍यांच्या सेवेत कसलाही बदल करू नये असे म्हटले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. सुरू असलेल्या अग्निशमन भरतीतही त्यांना सहभागी होता येणार आहे.
– सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, कामगार सेना, मनपा

भरतीसाठीही ठरतील पात्र

दरम्यान नाशिक मनपाने अग्निशमन विभागात 246 पदांची भरती काढली आहे. यात फायरमन पदेही आहेत. आता या भरती प्रक्रियेतही वरील मानधनावरील अग्निशमनच्या या कर्मचार्‍यांना सहभाग घेता येणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *