‘निमा’च्या घटनादुरुस्तीस विलंब; उद्योजकांत संताप

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या घटनादुरुस्तीसाठी दिलेली मुदत संपत आली असून, तरीही दुरुस्ती करून नवीन घटना समोर मांडलेली नाही. त्यामुळे सिन्नरच्या उद्योजक सभासदांत संताप व्यक्त केला जात आहे. घटनादुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी सिन्नर तालुक्यातील निमाच्या सभासदांकडून करण्यात
येत आहे.
सर्वसाधारण सभेत घटनेत बदल करून हे बदल सभासदांसमोर ठेवण्याचे ठरले होते. त्यात सभासदांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून डिसेंबरअखेरपर्यंत अंतिम घटना मांडण्यात येणार होती. परंतु, समितीचे प्रमुख गोगटे यांच्याकडून अजूनही कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे निमाची घटना केव्हा दुरुस्तीसह मांडली जाणार व केव्हा नवीन घटना सभासदांसमोर येणार, याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. सभासदांत दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली आहे. समितीने वेळखाऊपणा चालवला असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. सभासदांचा संताप विचारात घेता त्यावर दुरुस्ती समितीने तातडीने काम करणे आवश्यक आहे. दुरुस्तीसाठी सहा महिन्यांपासून अधिक काळ लोटला गेला आहे. एका संस्थेच्या घटनादुरुस्तीस इतका उशीर लागत असल्याबाबत उद्योजकांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.
समितीला डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
या मुदतीत घटनादुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु, हे निव्वल वेळखाऊपणा आहे. समितीने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी निमाच्या सभासदांनी केली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत घटनादुरुस्ती करून त्यानुसार जानेवारीमध्ये निमाच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी उद्योजक बबन वाजे यांनी केली आहे.

घटनादुरुस्ती वेळेत व्हावी…

‘निमा’ ही नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांची अग्रगण्य शिखर संस्था आहे. त्यामुळे लवकरात लवकर घटनादुरुस्तीचे काम मार्गी लागून सभासदांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढेल आणि मोठमोठे उद्योग -व्यवसाय नाशिकमध्ये येण्यास मदत होईल.
-रतन पडवळ, सभासद, निमा

दुरुस्तीत 63 वर्षांचा विचार

निमाची घटना 1982 ची आहे. तर पुढील किमान 20 वर्षांचा विचार करता 63 वर्षांचा विचार करून घटनादुरुस्ती केली जात आहे. समितीचे घटनादुरुस्तीचे काम सुरू आहे.
– विवेक गोगटे (अध्यक्ष, घटना समितीप्रमुख)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *