वाहन अडवून साडेचार लाखांची लूट

मुंबई- आग्रा महामार्गावरील मुंढेगावजवळील प्रकार

घोटी : प्रतिनिधी
नाशिक- मुंबई महामार्गावर इंदूरहून निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाला मुंढेगावजवळील जिंदाल कंपनीवरील पुलावर अडवून चालकाला मारहाण करीत वाहन पुन्हा नाशिक बाजूकडे घेऊन जात राजूर फाट्याजवळ नेऊन लुटले. यात लुटारूंनी साडेचार लाख रुपयांची रक्कम लुटल्याची फिर्याद वाडीवर्‍हे पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
अधिक माहिती अशी की फिर्यादी धर्मेंद्र पटेल (वय 48, रा. सुरत, गुजरात) हा किरण पटेल यांच्याकडे चालक म्हणून काम करत असून तो ग्वाल्हेर येथून मालकाचे सोने चांदीचे दागिने आणण्यासाठी साडेचार लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओने (डीएल 7 सीएस 4106) मुंबई येथे येत असताना पहाटे साडेपाचच्या दरम्यान मुंढेगावजवळील जिंदाल कंपनीसमोरील रेल्वे पुलावर इनोव्हा वाहन आडवे लावून स्कॉर्पिओ गाडीला अडवले. चालकाला मारहाण करीत शेजारी बसलेल्या दुसर्‍या व्यक्तीलादेखील मारहाण केली व तेथून स्कॉर्पिओ गाडी वळवून नाशिककडे परत फिरवले. राजूर फाट्याजवळ असलेल्या गुरुद्वारामागे नेत स्कॉर्पिओ वाहनातील साडेचार लाख रुपयांची रक्कम लुटून नेली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्‍हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *