उमेदवारी मिळण्याअगोदरच ‘फिक्स नगरसेवक’च्या पोस्ट
नाशिक : प्रतिनिधी
तब्बल तीन वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीत तन-मन- धनाने झोकून दिलेल्या अनेक इच्छुकांना निवडणूक जाहीर होताच आनंदाचे भरतं आले आहे. सोशल मीडियावर लागलीचफिक्स नगरसेवक अशा पोस्ट झळकू लागल्या आहेत. काहींनी तर प्रचारपत्रकेही तयार करून ते घराघरांत पोहोचवत प्रचाराचा धुराळाही उडवून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. नाशिक महापालिकेत तब्बल तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. 2022 पासून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र, निवडणुका जाहीर होत नसल्यामुळे अनेकांनी वारेमाप खर्च केल्यानंतर निवडणुका लांबत असल्याने हात आखडता घेतला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले होते. त्यातच नगरपालिका निवडणुका झाल्यामुळे महापालिका निवडणुका कधीही जाहीर होतील, अशी आशा लागलेली असतानाच विधानसभेचे हिवाळी अधिवेशन उरकताच निवडणुकीचे बिगुल वाजले. त्याअगोदरच निवडणूक जाहीर केव्हाही होऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. पत्रके छापून अनेक इच्छुकांची प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण झाली आहे. त्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाकडून उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्याखालोखाल शिंदे गटाकडे व नंतर अजित पवार गटाकडे ओढा दिसून येत आहे. तिकीट फिक्स नसले तरी काहींना फिक्स नगरसेवक झाल्याचे स्वप्नं पडू लागले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर, मोबाइलच्या स्टेटसवर फिक्स नगरसेवक, लढणार आणि जिंकणार, प्रभागातील जनतेचे ठरलंय.. अशा पोस्ट अनेक इच्छुक टाकत आहेत. विशेष म्हणजे, काही इच्छुकांमागे ना कार्यकर्त्यांचे बळ, ना आर्थिक गणित जुळेल एवढे भांडवल तरीही त्यांना नगरसेवकपदाचे स्वप्नं पडत आहे. सध्या निवडणूक लढविणे म्हणजे पैशांचा महापूर असे समीकरणच दृढ झाले आहे. असे असताना केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी करून अनेकांना नगरसेवक झाल्यासारखे वाटत आहे. सिडको भागात काही इच्छुकांना तिकीट मिळेल याची काहीच शाश्वती नसताना नगरसेवक होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे जनतेचीही चांगलीच करमणूक होत आहे.
I feel like becoming a councilor!