भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांचे देव पाण्यात

पंचवटी : सुनील बुनगे

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि इच्छुकदेखील तयारीला लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत विद्यमानांसह अनेक नवखेही उतरणार आहेत. यातील काहींनी गेल्या निवडणुकीत उमेदवारी केली होती तर अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून, गेल्या सहा ते सात वर्षांपासून तशी तयारीदेखील सुरू केली आहे. तर यंदाची निवडणूक महायुती विरोधात महाविकास आघाडी यांच्यात होणार असली तरी भारतीय जनता पक्षाने 100 प्लसचा नारा दिल्याने भाजप महायुती म्हणून लढणार हे जरी अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतीय जनता पक्षाकडे मात्र सर्वच प्रभागांमध्ये सर्वाधिक इच्छुक असल्याने पक्षाच्या विद्यमानांसह इतर इच्छुकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले नसतील तर नवलच!
यंदाची निवडणूक ही सिंहस्थ कुंभमेळा असल्याने महत्त्वाची ठरणार असून, अभी नहीं तो कभी नहीं, या वाक्यानुसार जोरदार होणार, हे मात्र निश्चित झाले आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून अनेक जण तयारी करत असून, अनेकांनी कोविड काळात नागरिकांना मदत केल्याने त्याचाही फायदा या निवडणुकीत अशा कार्यकर्त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाने 100 प्लसचा नारा दिल्याने महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये होणार का नाही, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. तर भाजपामध्ये अनेक इतर पक्षांमधून विद्यमान आणि इतरही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याने मात्र भाजपमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल वाढली आहे. गेले अनेक वर्षे पक्षाशी निष्ठा असलेले यामुळे चांगलेच हतबल झाले असून, यंदा नाही तर पुन्हा कधीच नाही, अशी चर्चादेखील कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाने इच्छुकांच्या नुकत्याच मुलाखती घेतल्या आहेत.तर अनेकांनी उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे अर्जदेखील दाखल केले आहेत. त्यातच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीदेखील एकत्रित लढणार असे म्हणत असले तरी त्यांच्यातदेखील एकमत झालेले नसल्याने त्यांचेही नेते, कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने येत्या काही दिवसांत मात्र निवडणूक प्रक्रियेला वेग येणार असून, अनेक कार्यकर्त्यांची मात्र यामुळे धावपळ उडणार आहे. यानिमित्ताने मात्र भाजपकडे सर्वाधिक इच्छुक असलेल्या विद्यमानांसह इतर इच्छुक मात्र देव पाण्यात बुडवून बसले आहेत, हे मात्र नक्की!

आम्हाला कामाला लागायला सांगितलंय!
अनेक भाजपच्या विद्यमानांसह इतरही कार्यकर्ते तयारीला लागले असल्याने घरोघरी प्रचारपत्रक पोहोचविण्यासाठी सर्वच इच्छुकांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. त्यातच घरोघरीसुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक इच्छुकांनी तर आमचं तिकीट फायनल, असे सांगून जशी उमेदवारी आपल्यालाच मिळाली आहे अशा पद्धतीने प्रचारदेखील सुरू केला आहे. काहींनी तर महिनाभराआधीच प्रचाराचे नारळ फोडून प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. काही इच्छुक पक्षाच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात मात्र पक्ष कोणाच्या पदरात उमेदवारी टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Those who want to get a BJP ticket are drowning in water

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *